– गडचिरोली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : तालुक्यातील विहीरगाव शेत शिवरानजीकच्या पोटफोडी नदीच्या काठावर पोलिस व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या धाड टाकून मोहफुलाच्या सडव्यासह ७३ हजारांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदा तुळशीराम दळांजे (५६), निखिल विलास कुनघाडकर (२५) दोन्ही रा. विहीरगाव असे आरोपींचे नाव आहेत.
विहीरगाव गवानजीकच्या पोटफोडी नदीच्या काठावर हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. त्यांनुसार पोलिस कर्मचारी व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शोधमोहीम राबवून हातभट्ट्या उध्वस्त केल्या. तसेच घटनास्थळावरून ७० हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा, २ हजार रुपये किंमतीची दारू व १ हजार रुपये किंमतीचे साहित्य असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करीत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवदास दुर्गे, सिडाम व पथकाने केली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, तालुका उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.