मुरुमगाव येथील धान्य घोटाळ्याची चौकशी करा

288

– अ.अ. भ्र. विरोधी समिती जिल्हा उपाध्यक्ष रोशन कवाडकर यांची व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदनातुन मागणी
गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३० ऑगस्ट : तालुक्यातील मुरुमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत झालेल्या हजारो क्विंटल धान्य घोटाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष रोशन कवाडकर यांनी व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांना निवेदनातून केली आहे.
मुरुमगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत हजारो क्विंटल धान्याचा घोटाळा म्हणजे अंदाजे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असल्याचे दिसून येत आहे. धान्य खरेदी केंद्रामध्ये सुरसुंडी सह जवळपास १७ गावांचा समाविष्ट आहे. खरेदी केंद्रात सभासद शेतकऱ्यांचे खरीप हंगामात २७६५८ क्विंटल धान्याची खरेदी झाली, तर रब्बी हंगामात ६०१० क्विंटल धान्य खरेदी करण्यात आले. त्यापैकी खरिपातील १९,६४० क्विंटल धान्याचे डिओ उचल झालेले आहेत व उर्वरित ८०१८.१५ क्‍विंटल खरिपाचे धान शिल्लक दिसून आले आहे. रब्बीचे ४१५० क्विंटल उचल होऊन १८६०.८ क्विंटल शिल्लक असल्याचे दस्ता-ऐवजांवरून दिसून येत आहे. मात्र प्रत्यक्षात अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती गडचिरोली व संबंधित गावातील प्रतिष्ठित नागरिक व इतरांच्या समवेत गोदामाची पाहणी केली असता गोदामात धान्य दिसून आले नाही व गोदाम हे रिकामे होते.
सन २०२१-२२ मध्ये ७८७ सभासदांचे सातबारा ऑनलाइन करण्यात आले होते. त्यापैकी ७३४ शेतकऱ्यांचे लाट पाडण्यात आले व सर्व सभासद शेतकर्‍यांचे धान्य खरेदी करून त्यांचे बिल तयार करून सदर बिलाची उचल सुद्धा करण्यात आली. मात्र काही शेतकऱ्यांचे पैसे अद्यापही मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. खरीप व रब्बी मिळून ९८७८.९५ क्विंटल धान्याचा तुटवडा सरासरी अंदाजे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. याबाबत उपप्रादेशिक व्यवस्थापक डी.एम. चौधरी यांच्याशी संपर्क करून विचारणा केली असता सदर भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून याबाबत सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ करताना दिसून आले. यावरून सदर भ्रष्टाचारात त्यांचा सुद्धा सहभाग असल्याचे नाकारता येत नाही. तसेच व्यवस्थापक यांच्या संगमताने भ्रष्टाचार करून अमाप संपत्ती सुद्धा जमा केल्याचे दिसून येत आहे. सदर भ्रष्टाचारात वरिष्ठ अधिकारी यांचा सुद्धा सहभाग असल्याचे नाकारता येत नाही. तसेच उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत इतर १३ केंद्रात सुद्धा भ्रष्टाचार झाले असल्याचे संशय येत आहे. तरी याबाबत संबंधित अधिकार्‍यांची व केंद्रप्रमुख यांची तसेच १३ केंद्राची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समिती गडचिरोलीचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन कावडकर यांनी मा.व्यवस्थापक म.रा.सह.संस्था आदिवासी विकास महामंडळ मर्या. नाशिक यांना पाठविलेल्या निवेदनातुन केली केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here