मुक्तिपथ मॅरेथॉन स्पर्धेत ५२ जणांचा सहभाग

144

– मुक्तिपथ तर्फे देलनवाडी येथे उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, २३ सप्टेंबर : आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथे गाव समिती व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. “दारू व तंबाखू पासून मुक्तीसाठी धावूया ही या स्पर्धेची मुख्य थीम असून स्पर्धेच्या माध्यमातून गावाच्या दारू व तंबाखू विक्री मुक्तीसाठी गावातील सक्रीय युवक, महिला व पुरुष यांनी एकत्र यावे. संघटना बनवून पुढे कृती करावी व गाव दारू विक्री मुक्त करावे हा कार्यक्रमाचा मुख्य हेतू आहे. याच उद्देशाने मुक्तिपथ द्वारा गावातील संघटन सदस्याच्या सहकार्याने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिला, युवक, युवती व पुरुष असे मिळून एकूण ५२ जणांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.

स्पर्धेची सुरवात तंमुस अध्यक्ष हरबाजी घोडमारे यांच्याहस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून करण्यात आली. उपस्थित सर्व स्पर्धक व गावकरी यांनी दारू व तंबाखू मुक्तिचा सुरवातीला संकल्प घेतला. ही स्पर्धा चार गटात घेण्यात आली. यामध्ये १८ ते २५ वयोगटात १५ युवती व ८ युवक तसेच महिला गटातून २० महिला व  पुरुष गटातून ९ अशा एकूण ५२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान चारही गटातून तीन-तीन विजेते निवडण्यात आले व विजेत्यां स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बक्षीससह मेडल तसेच मा. जिल्हाधिकारी व डॉ. अभय बंग यांचे सहीचे प्रमाणपत्र, व्यसनमुक्ती विषयावरील गाण्याचे पुस्तक इत्यादी साहित्य सत्कारमूर्तीला देण्यात आले.

दरम्यान, स्पर्धेनंतर ग्रामपंचायत सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुक्तिपथचे कार्य, उद्देश स्पष्ट करण्यात आले. सोबतच गावाला दारू व तंबाखूमुक्त करण्यासाठी युवक, युवती, महिला व पुरुषांनी पुढाकार घ्यावा. तसेच मुक्तिपथ सोबत जुळून काम करण्याचे आवाहन देसाईगंजचे तालुका संघटिका भारती उपाध्ये यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन आरमोरी तालुका कार्यकर्ते विनोद कोहपरे, देसाईगंजचे उपसंघटक अनुप नंदगिरवार, पल्लवी मेश्राम व सुषमा वासनिक यांनी केले. सदर स्पर्धा बघण्यासाठी गावातील महिला, बाल गोपाल यांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवली व  इतर गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here