मी सहनशील का व्हावे? म्हणणेच व्यर्थ !

174

विश्व सहनशीलता दिन सप्ताह

जगात जेवढे म्हणून तंटे-बखेडे होतात, त्यांचे मूळ कारण म्हणजे कोणत्या ना कोणत्या दिव्य गुणाचा अभाव हेच आहे. माणसामाणसांमध्ये जी भिन्नता आढळून येते, तीसुद्धा कोणत्या ना कोणत्या दिव्य गुणाच्या उणिवेमुळेच होय. तेव्हा दुर्गुण सोडून दिव्य गुण धारण करण्यासाठी प्रोत्साहन देणे, हेच जगातील सर्व तत्त्वज्ञानाचे व धर्मग्रंथाचेही उद्दिष्ट आहे. नागरिकांची बांधिलकी या चळवळीसाठी ते आवश्यक आहेत. आजचा विश्व सहनशीलता हा दिवस याच संदेशासाठी प्रायोजित केला आहे. मतभिन्नता किंवा दुसऱ्याची मते लादून घेणे म्हणजे सहनशीलता नव्हे, तर परस्परावरील आदराने आणि एकमेकांशी समेट करून जगण्याचा तो एक मार्ग आहे. जागतिक पातळीवरील विविधतेला न घाबरता तिचा अंगीकार करणे, हाच तर सहनशीलतेचा पाया ठरतो. माणसातील अंतर्मुखता, गांभीर्य, धैर्य, शीतलता, नम्रता, संतुष्टता, सरलता हे सर्वही दिव्य गुण आहेत. या सर्वही गुणांमध्ये आणखी एक महान गुण आहे सहनशीलता. कोणतेही श्रेष्ठ उद्दिष्ट गाठायचे म्हणजे सारे काही सहन करावे लागते.
“खोद खाद धरती सहे, काँट कूँट बनराय| कटु वचन साधु सहे, औरौं को सहा न जाए||”
दि.१६ नोव्हेंबर १९९५ पासून हा दिवस साजरा करण्यात येतो. मानवी मूलभूत हक्कांची जोपासना करीत असताना, मानवतेची अस्मिता जपताना, मानवी मूल्यांची कदर करीत आपल्या पुढच्या पिढीला युद्धाच्या अरिष्टापासून वाचविण्यासाठी असहनशीलतेचा अंत व्हावा, या उद्देशाने युनेस्कोने या दिवसाची घोषणा केली होती. मानवी बुद्धिमत्ता आणि एकजूट यांचा वापर करून पृथ्वीवर सर्वत्र व सतत शांती पसरावी, यासाठी राष्ट्रकुल सतत प्रयत्नशील असते. आजचे जग दहशतवाद, जातीयवाद, हिंसा, प्रांतीयवाद, तीव्र राष्ट्रीयता, मूलतत्त्ववाद आदींमुळे अस्वस्थ आहे. म्हणून राष्ट्रकुल आपल्या सदस्य राष्ट्रांना आवाहन करते, की जात, धर्म, भाषा, लिंग, राष्ट्र असे भेदभाव बाजूला सारून सकलांनी मानवतेच्या उद्धारार्थ सहनशीलतेची कास धरली पाहिजे. सहनशीलता हाही एक सद्गुण आहे व त्यामुळे सर्वत्र शांती नांदते. इतकेच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक प्रगतीस हातभार लागतो. त्यासाठी राज्यपातळीवरील कायद्याने सर्व नागरिकांना समान हक्क दिले पाहिजेत. समाजातील विविध गटात मतभेद होऊ शकतात. पण ते मिटविण्यासाठी समर्थ यंत्रणा देखील कार्यरत असायला हवी. सहनशीलतेचा प्रसार होण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे. जागतिक पातळीवरील विविधतेला न घाबरता तिचा अंगीकार करणे हाच तर सहनशीलतेचा पाया ठरतो. सन २००५च्या विश्व परिषदेत या घोषणेचा पुनरुच्चार होऊन राष्ट्रीय नेत्यांनी आणि त्यांच्या सरकारांनी सहनशीलतेला उत्तेजन देऊन वेगवेगळ्या समाजगटात, संस्कृती विभागात तसेच लोकांमध्ये संवाद घडवून आणला पाहिजे. त्यांच्यात परस्पर सहकार्याची भावना रूजवून प्रगतीच्या दिशेने नेण्यास प्रयत्न असावेत. हा दिवस साजरा करण्यासाठी दहा मुद्यांवर भर दिला जातो- १) समाजातील विविधतेचा अभ्यास करा. अनेक वाद्ये एकत्रित येऊन वाद्यवृंद कर्णमधूर संगीत निर्माण करतो, हे उदाहरण लक्षात ठेवा. २) समाजातील विविध घटकांना, मग ते धामिर्क असोत, जातीय असोत, भाषेचे असोत, त्यांच्या मानवी हक्कांची जोपासना करा.३) स्वत:ची अशी सहनशीलता प्रकल्पाची योजना आखा. स्वत:ची दुसऱ्यांच्या जागी कल्पना करून बघा. ४) घरीदारी, शाळा-कॉलेजमध्ये, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी हिंसेला थारा देऊ नका. ५) हवामान आणि पर्यावरण सगळ्यांशी सारख्याच प्रमाणात निगडीत असते. तेव्हा पर्यावरणाचा एखादा प्रकल्प राबवून सर्वांना एकत्र आणा. ६) सणावारी सर्वधर्मसमभाव प्रेरित करण्याचे मेळावे आयोजित करा. निरनिराळ्या धर्मातील तत्त्वांचा अभ्यास करा. ७) एखादी ताजी घटना घडली असेल तर तिचा उहापोह करण्यासाठी तज्ज्ञांची चर्चासत्रे भरवा. त्या घटनेचे मूळ कारण सकलांना कळू द्या. ८) खेळक्रीडांचे सामने सहनशिलता अंगी मुरविण्यास बऱ्यापैकी हातभार लावतात. समाजात खिलाडू वृत्ती रुजविण्याचा प्रयत्न करा. ९) आपली क्रयशिलता वापरून नवनिमिर्ती करा. कथा, नाटक, कविता, गाणी, लेख, चित्र, छायाचित्र याद्वारे सहनशिलतेचे गुणगान गा. १०) आपल्या कार्याद्वारे जागतिक पातळीवर सहनशिलतेचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी युनेस्कोच्या असोशिएट प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हा.
एकदा एक गुराखी चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. गुरांना चरण्यासाठी सोडून दिल्यावर एकटाच एका झाडाखाली बसला. वेळ घालवण्यासाठी म्हणून जवळच पडलेल्या एका दगडाने दुसऱ्या दगडावर आघात करू लागला. दोन-तीन आघात झाल्याबरोबर तो दगड तुटला व थोड्या अंतरावर जाऊन पडला. गुराख्याने दुसरा दगड घेतला व आता या दगडावरही तो तसेच आघात करू लागला. या दगडाने मात्र ते सर्व घाव सहन केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या दगडाचे एका सुंदर मूर्तीत रूपांतर झाले. त्या गुराख्याने ती मूर्ती तेथेच ठेवली व गुरांना घेऊन निघून गेला. रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजुरांना जेव्हा ती मूर्ती दिसली तेव्हा त्यांना वाटले, की हा तर चमत्कारच झाला. सकाळी तर येथे मूर्ती नव्हती. प्रभूने आपल्यासाठीच ही मूर्ती पाठवली असेल. अवश्य आपणास या मूर्तीसाठी मंदिर बनवावे लागेल, असे म्हणून ग्रामस्थांनी सगळ्यांच्या सहयोगाने तेथे मंदिर बनवून त्यात या मूर्तीची स्थापना केली. या मूर्तीवर वाहण्यासाठी नारळ फोडायला दगड हवा होता म्हणून एक ग्रामस्थ खाली पडलेला एक दगड उचलतो तर तो तोच दगड असतो जो त्या गुराख्यांच्या फक्त दोन-तीन प्रहारांनी तुटलेला असतो. त्याला मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवले जाते. आता रोज त्याच्यावर नारळ फोडले जातात. एकदा कुणीही नसताना त्या मूर्तीने अचानक दरवाजातील दगडाला विचारले, काय मित्रा, कसा आहेस? तेव्हा उत्तरादाखल दगड म्हणाला, की काही नको विचारू बाबा. दिवसभर झालेल्या आघातांना तू सहन केलेस म्हणून आता तुझी पूजा होते आहे, पण मी मात्र एक-दोन आघातांनी घाबरून गेलो. आता मात्र रोजच माझ्या शरीरावर आघात होत आहेत. याचा पश्चात्ताप मला आयुष्यभर होतच राहील. म्हणूनच म्हटले जाते, की “टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.” दगडापासून मूर्ती जेव्हा घडत असते, तेव्हा तिला घाव मोठ्या आनंदाने सहन करावे लागतात. याउलट जे दगड हे घाव न सोसता तुटून पडतात. त्यांचा वापर मंदिराच्या बांधकामात केला जातो. सागराच्या किंवा नदीच्या लाटांशी टक्कर देत देत त्यातील दगडही पूजनीय प्रतिमा शालिग्राम बनतात.
“सहनशीलता धारण करीत देवत्व येई अंगी| अन्यथा मूर्ती ती अपुरी, पूजन न होई जगी||”
मात्र बऱ्याच अंशी जनमानसात सहनशीलतेचा अभाव दिसतो. आम्हीच का म्हणून एवढे मोठे दुःख सहन करायचे, असा प्रश्न सगळ्यांना सतावत असतो, माझ्याऐवजी दुसरा कोणी असता तर कधीच एक घाव दोन तुकडे करून मोकळा झाला असता. आपल्याला वाटते, समोरची व्यक्ती बदलत नाही, परंतु आपण तर बदलू शकतो ना? आपली कृती त्याची वृत्ती बदलू शकते. म्हणूनच असे म्हटले जाते-
“बदल न लो, बदल के दिखाओ।”
सहनशील व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत उदास होत नाही, खचून जात नाही. ती राईचा पर्वत करत नाही, उलट राईलाही राईसमानच अनुभवते. येशू ख्रिस्तानेदेखील मरतेवेळी सांगितले, की हे प्रभो, त्यांनी मला जिवे मारले ते अज्ञानी आहेत. त्यांना तू क्षमा कर. जी व्यक्ती स्वामी दयानंदांना विष देण्यास निमित्त बनली, त्या व्यक्तीलाही स्वामींनी क्षमा केली. गुरू गोविंदसिंगांची दोन छोटी मुले हसत-हसत भिंतीत चिणली गेली. संत मीराबाईनेही प्रभुप्रेमामुळे विषाचा प्याला सहजगत्या स्वीकारला. संत एकनाथजी देखील सहनशक्तीचा मेरुमणी होते. सहन केल्याने आपली मनाची शक्ती वाढते व आपली पवित्रताही दुगुणीत होते. सहनशील माणसाची लक्षणे अशी, की कोणी त्याची निंदा करो, त्याच्याशी कठोरतेने बोलो, मात्र त्याचा चेहरा आनंदी राहतो. त्यावर मलूलतेचे चिन्ह दिसत नाही. गीतेतही म्हटलंय-
“तुल्यनिंदा स्तुतिर्मोनि संतुष्टो येन केनचित!”
अर्थात प्रत्येकाला जीवनात मान, अपमान, निंदा, हार, जीत यांचा सामना करावाच लागतो. परंतु विपरीत परिस्थितीतही सहनशीलता आपणास शांत व अचल, मुख्य म्हणजे आनंदात ठेवू शकते.
एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले, की मी तुम्हाला एका बिकट कामगिरीसाठी जवळच्या प्रदेशात पाठवणार आहे. तेथील लोकांना तुम्ही काही सांगितले व त्यांनी तुमचे ऐकले नाही तर तुम्ही काय कराल? शिष्यांनी उत्तर दिले, की तथागत, असे झाले तर आम्ही समजू येथील लोक फारच चांगले आहेत. त्यांनी आमचे ऐकून घेतले नाही हे खरे. पण उलटून शिव्या दिल्या नाहीत. यावर तथागत म्हणाले, की ठीक आहे. त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या, काही अपशब्द वापरले तर तुम्ही काय कराल?’’ शिष्य म्हणाले, की तरीदेखील आम्ही समजू इथले लोक चांगले आहेत. त्यांनी आम्हाला फक्त शिव्याच दिल्या, मारहाण तर केली नाही. पुन्हा तथागत म्हणाले, की जर त्यांनी तुम्हाला मारलं तर? शिष्य म्हणाले, की आम्ही म्हणू की हे लोक किती चांगले आहेत, कारण यांनी आमचा जीव तर घेतला नाही. पुन्हा तथागत म्हणाले, की समजा, त्यांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर? शिष्य म्हणाले, की आम्ही असेच समजू की या प्रदेशातील लोक सज्जन आहेत. त्यांनी आम्हाला भगवंताचे काम करतानाच भगवंताच्या पायापाशी पोहचवले? शिष्याचे हे उत्तर ऐकून तथागत हसले व म्हणाले, की तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झालात. अशा प्रकारची पराकोटीची सहनशीलता अंगीकारल्यामुळे तुम्हाला कुठेही हमखास यश प्राप्त होईलच, यात मुळीच शंका नाही.
कधी-कधी किरकोळ गैरसमजुतींनी अनेक वर्षांची मैत्री, ऋणानुबंध धोक्यात येतात, केवळ सहनशक्तीच्या कमतरतेमुळे हे घडते. परंतु तुमच्याशी उगाच वैर बाळगणाऱ्या, तुमच्याशी भांडणाऱ्या विरोधकाचाही तुमच्या मधुर शुभभावना व शुभकामनांद्वारे सहनशीलतेचा पाठ तुम्ही शिकवू शकता. एका ऑफिसात काही दिवसांपूर्वी घडलेली एक गोष्ट आठवते. एक ऑफिसर त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कारकुनाला अद्वातद्वा बोलला. त्या बोलण्यात शिव्यांचाही समावेश होता. तरीही तो कारकून मात्र शांत उभा होता. त्याच्यावर आपल्या बोलण्याचा काहीएक परिणाम होत नाही, असे पाहून तो अधिकारी आणखी चिडला. त्याचा राग एवढा नियंत्रणाबाहेर गेला की अक्षरश: तो त्या कारकुनाच्या अंगावर थुंंकला. तरीही तो कारकून शांतपणे समोर असलेल्या वॉश बेसिनकडे गेला व त्याने आपला चेहरा धुतला व तसाच पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला. ते पाहून त्याचा अधिकारी वरमला. तो त्याच्या टेबलाजवळ आला व त्याला विचारू लागला, ‘‘मी तुझ्याशी एवढं वाईट वागलो तरीही तू एक चकार काढला नाहीस हे कसे काय?’’ तेव्हा तो कारकून म्हणाला, ‘‘जे काम फक्त पाण्याने होऊ शकते ते करण्यासाठी मी दगड का हातात घेऊ?’’ हे ऐकल्याबरोबर त्या अधिकाऱ्याचे हृदयपरिवर्तन झाले. सहनशीलतेची शक्ती ही आपली अविनाशी दौलत आहे. ही दौलत प्रत्येकाला वाढवायला हवी. स्वत:च्या कल्याणासाठीच नव्हे तर इतरांच्याही भल्यासाठी विश्वच माझे घर ही संकल्पना आपणास मान्य आहे. म्हणून सर्व आपल्यांसाठी सहनशीलतेची कास धरावीच. म्हटले जाते-
“जो सहन करतो, तोच शहेनशाह बनतो!”
!! The गडविश्व परिवारातर्फे जागतिक सहनशीलता दिनानिमित्त सहनशील होण्यास सर्व बांधवांना सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(आध्यात्मिक विचार प्रकटक)
गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here