– आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केल्याने होत आहे शुभेच्छांचा वर्षाव
The गडविश्व
गडचिरोली : आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे नाव उंचावून पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींची आश्रम शाळा खमनचेरु येथील शिक्षिका अवंती गांगरेड्डीवार यांचा मा.जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अवंती गांगरेड्डीवार या नुकताच बेंगलोर येथे झालेल्या स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया (SAI) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट पटियाला च्या कबड्डी (NIS) प्रशिक्षणा “A” ग्रेड मध्ये पास झाल्या व अर्जुनवाडी हुनपप्पा यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्राप्त केला आहे. तसेच भारतीय कबड्डी संघाचे प्रशिक्षक भास्करन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अवंती गांगरेड्डीवार ह्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी बीएससी, बीपीएड , एमपीएड चे पूर्ण शिक्षण घेतले असून त्या २०१९ पासून अहेरी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक मुलींची आश्रम शाळा खमणचेरु येथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
विदर्भातून कबड्डी मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट (NIS) प्रशिक्षण करून ‘अ’ श्रेणीमध्ये पास होणाऱ्या त्या पहिल्या प्रशिक्षक आहेत. गेल्या तीन वर्षापासून आदिवासी मुलींना प्रशिक्षण देऊन राज्य व राष्ट्रीय स्तरावर मुलींना त्यांनी खेळवले आहे तसेच मुलींना शाळेमध्ये सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण देत आहेत. अवंती गांगरेड्डीवार ह्या मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील असून त्यांनी शिकाई मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचे तसेच राज्याचे नाव उंचावले आहे. त्यामध्ये गोडवाना विद्यापीठाचा कलर कोट असून आजपर्यंतच्या मिळालेल्या यशाचे श्रेय त्या आपल्या परिवाराला व प्रशिक्षकांना देत आहेत. अवंती गांगरेड्डीवार यांनी अनेक राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावाने केलेले आहेत हे विशेष. त्यांनी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावाने प्राप्त केल्याने त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात गौरव करण्यात येत आहेत. तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.