माझी वसुंधरा अभियानांतर्गत सायकल परेडने रचला विक्रम

412

– २ हजार ४४५ सहभागींनी पूर्ण केली ७ किलोमीटरची परेड
The गडविश्व
भंडारा : माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज खात रोडवरील रेल्वे ग्राउंडवर आयोजित सायकल परेडला उदंड प्रतिसाद लाभला. शालेय विद्यार्थ्यांपासून तर गृहिणीपर्यंत सर्वस्तरातील नागरिकांनी या परेडमध्ये उत्साहाने भाग घेतला. जिल्ह्यात आजपर्यंत घेण्यात आलेल्या सर्व सामूहिक उपक्रमांमधील विक्रमी उपस्थिती ठरलेला हा पहिला उपक्रम ठरला. या परेडसाठी 2 हजार 960 सायकलप्रेमींनी काल अखेर पर्यंत नोंदणी केलेल्या 2 हजार 462 नागरिकांनी परेडमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला, तर 2 हजार 445 नागरिकांनी परेड पूर्ण केली. परेड दरम्यान रस्त्याच्या आजूबाजूला नागरिकांनी सायकलपटूंना प्रोत्साहित केले. सूक्ष्म नियोजन व अधिकाऱ्यांच्या उत्तम समन्वयाने परेडच्या 63 रांगा एकामागून एक शिस्तीने मार्गक्रमण करत होत्या.

संपूर्ण परेड दरम्यान उत्साह ओसंडून वाहत होता. 400 स्वयंसेवकांनी दिलेल्या सेवेमुळे जल्लोषासह शिस्तबध्दतेचे दर्शन परेड दरम्यान झाले. परेडच्या सुरूवातीपूर्वी देशभक्ती गीतांसह एरोबिक्स तसेच झुंबावर व्यायाम प्रात्यक्षिकांनी उपस्थितांमध्ये चैतन्य पसरले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत माझी वसुंधरा अभियानांतर्गत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी पर्यावरण रक्षणाची सामूहिक शपथ उपस्थितांना दिली. त्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले. यावेळी आमदार नाना पटोले, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, विभागीय आयुक्त प्राजक्ता लंवगारे-वर्मा, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, सायकलपटू अमित समर्थ, सुनिता धोटे या सर्वांनी तिरंगी रंगाचे फुगे हवेत सोडून या परेडचा शुभारंभ केला.
निसर्ग संवर्धन व देशप्रेमाची सांगड घालत आजच्या परेडने शिस्तबध्दतेचा परिचय दिला. बचत गटातील 180 महिलांनी उपस्थितांना टोप्या, पाणी व अल्पोपाहार वाटप केले. नगरसेविका श्रीमती बोरकर यांच्यासह आयोजक सह आयुक्त नगर पालिका प्रशासन चंदन पाटील, मुख्याधिकारी विनोद जाधव, भंडारा सायकल क्लबच्या वैशाली गोमकाळे यांनी परेड दरम्यान वेळोवेळी मार्गदर्शन केले. क्रीडा अधिकारी मनोज पंधराम यांनी माझी वसुंधरा तेलचित्र रेखाटून पर्यावरण संरक्षणचा संदेश दिला. नेहरू युवा केंद्राच्या 162 स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेतला.
या परेडची नोंद लिम्का बुकमध्ये होण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहेत. लिम्का बुक रेकॉर्डसाठी साकोली उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, डॉ. गोपाल व्यास हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. परेडचा विस्तृत व वस्तुनिष्ठ अहवाल हे निरीक्षक सादर करतील व त्याची पडताळणी करून एक ते दीड महिन्यानंतर लिम्का बुक नोंद घेणार आहे. यापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 3 मार्च 2019 रोजी झालेल्या सायकल परेडची नोंद आहे. ज्याचे अंतर 3.2 किलोमीटर होते तर 1 हजार 327 सायकलपटूंनी परेडमध्ये भाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here