– जिल्हास्तरीय विविध विभागांचा घेतला आढावा
The गडविश्व
गडचिरोली : कायद्याद्वारे व शासनाकडून महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विविध नियम, कायदे व योजनांची अंमलबजावणी होत असते. परंतू समाजात काही प्रमाणात महिलांवर अत्याचार होत असतात. अशा सर्वच मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या महिलांच्या तक्रारी वेळेत नोंदवून त्यांना न्याय देण्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाने वेळेत कार्यवाही करावी अशा सूचना महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी आढावा बैठकीत दिल्या. त्या गडचिरोली येथे दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी जिल्हयात महिलांबाबत काम करणाऱ्या व महिला अस्थापना असलेल्या विविध ठिकाणी भेटीही दिल्या. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांबाबत काम करणाऱ्या विभागांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकित गोयल उपस्थित होते.
यावेळी त्या म्हणाल्या, जिल्हयात समुपदेशन केंद्रांची संख्या वाढवून त्या ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ भरावे. जर अशासकीय संस्था नियमांप्रमाणे काम करीत नसतील तर त्यांना बदलून इतर संस्थांना संधी द्या. यामुळे महिला, मुली व बालकांना वेळेत समुपदेशन देणे शक्य होईल. जिल्हयात महिलांबाबतच्या लैंगिक अत्याचाराबाबत विविध शासकीय व अशासकीय कार्यालयांमधे १० पेक्षा जास्त लोक काम करीत असतील तर अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. जिल्हयात अजूनही १०० शासकीय व ७९ अशासकीय अस्थापनांनी समिती स्थापन केली नाही ही गंभीर बाब आहे. याबाबत तातडीने संबंधित आस्थापनांना लेखी सूचना देण्याचे आदेश त्यांनी महिला व बालकल्याण अधिकारी यांना दिले. प्रत्येक आस्थापनांनी कार्यालयाबाहेर महिलांच्या तक्रारीबाबत स्थापन केलेल्या अंतर्गत तक्रार समिती चे फलक व संपर्क क्रमांक लावावेत. तसेच महिला व मुलांना तक्रारी देता याव्यात म्हणून तक्रार पेटी बसवा अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
गडचिरोली जिल्हयात कोरोना काळात अनाथ बालकांना, विधवा झालेल्या महिलांना केलेल्या मदतीबाबत प्रशासनाचे कौतूक त्यांनी केले. जिल्हयातील महिला अर्थिक विकास महामंडळ, महिला व बालकल्याण विभाग तसेच उमेद मार्फत राबविण्यात येणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या योजनांबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी घोट येथील बालगृहाला बैठकीआधी भेट दिली.
महिला आयोगाच्या 155209 या हेल्पलाईन क्रमांकाचे फलक लावा
महिलांना तातडीने मदत मिळावी म्हणून महिला आयोगाने टोल फ्री 155209 हा क्रमांक सुरू केला आहे. याबाबत सर्वांना माहिती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. भरोसा सेल, महिला कार्यालये तसेच शासकीय स्तरावर 155209 या क्रमांकाची प्रसिद्धी करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.