– गावसंघटनेचे सरपंचाना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान आपण दिलेल्या वचनाप्रमाणे कोरची तालुक्यातील नवरगाव ग्रापं अंतर्गत भीमपूर व नवरगाव या गावातील अवैध दारूविक्री त्वरित थांबवा, अशी मागणी नवरगाव गाव संघटनेच्या महिलांनी सरपंच यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
भीमपूर व नवरगाव येथे सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत समिती पुनर्गठीत करण्यात आली. गावातील अवैध दारू बंद करण्याचा निर्णय घेऊन गाव दारुमुक्त करण्यासाठी सरपंच यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीमूळे महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. कमी वयाचे मुल दारूच्या आहारी जाऊन व्यसनी होत आहेत. हा अवैध व्यवसाय बंद झाल्यास घरात होणारे भांडण-तंटे कमी होतील. सरपंच म्हणून गावाच्या विकास कामास जनतेची चांगली साथ मिळणार. जिल्ह्यातील दारूबंदी जनतेच्या हिताची आहे. गावातील दारूविक्री बंद करून दारूबंदी अधिक मजबूत करा. ग्रामपंचायत तर्फे गाव दारूमुक्तीचा प्रस्ताव पारित करून दारुबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलिस विभागाकडे मागणी करा. गावातील अवैध दारूविक्री बंद करून गावाचा विकास करा, अशी मागणी गावसंघटनेच्या महिलांनी सरपंचाकडे केली आहे.
