फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार अंगिकारल्याशिवाय ढिवर जमातींचा विकास शक्य नाही : भाई रामदास जराते

327

The गडविश्व
गडचिरोली : मनुवादी व्यवस्थेने ढिवर जमातीतल्या लोकांना सामाजिक गुलामगिरीत ठेवलेले आहे, वरच्या समाजातील लोकांच्या घरी पाणी भरणे, भांडी धुणे, पालख्या उचलणे अशीच कामे पिढ्यानपिढ्या माथी मारले आहेत. यामुळेच ढिवर जमातींमध्ये कमालीची गरिबी निर्माण झाली असून सामाजिक प्रवाहात येण्यासाठी आता ढिवर जमातीतल्या लोकांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार स्विकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस आणि ढिवर जमातीचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.
गडचिरोली येथे ढिवर समाज युवक संघटनेद्वारा आयोजित घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमानिमित्त तरुणांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, देवेंद्र चिमनकर, क्रीष्णा वाघाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, ढिवर जमातीवर परंपरेने लादलेली सामाजिक गुलामी स्वातंत्र्यानंतरही संपुष्टात येवू शकली नाही. अस्तित्वहिन कर्मकांड, देवधर्म आणि व्यसनाधीनतेमध्ये गुरफटलेला असल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी राज्यघटनेत विविध तरतुदी केल्या आहेत. मात्र ढिवर जमातींमधील लोकांनी बाबासाहेबांना न स्वीकारल्याने अज्ञान पसरले आहे, असे वास्तवही त्यांनी मांडले.
सध्या ढिवर जमात देवधर्म, कर्मकांडांना उत्तेजना देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विविध संघटना आणि राजकीयदृष्ट्या भारतीय जनता पक्षाच्या दावणीला बांधली गेली असल्याचे चित्र असल्याची टीका करुन ते म्हणाले, ढिवर जमातीला सामाजिक, शैक्षणिक प्रगती साधायची असेल तर भारतीय जनता पक्षासारखे जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पक्षांना तिलांजली देऊन फुले, शाहू,आंबेडकरांची चळवळ पुढे नेणारे नवे राजकीय पर्याय स्विकारुन आपल्या जमातीची प्रगती साधावी,असे आवाहनही भाई रामदास जराते यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here