– खरीप हंगाम २०२२ मध्ये कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ७ जुलै : शासनाने 1 जुलै 2022 च्या शासन निर्णयान्वये खरीप हंगाम 2022 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला असून, या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 पर्यंत आहे. सदर योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकासाठी बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामातील पिकांसाठी 2 टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आलेला आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
या वर्षाची योजना कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक नसुन संपुर्णता ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकरी यांनी योजनेत सहभागी न होण्याची व विमा हप्ता कर्ज रकमेतुन वजावट करुन विमा कंपनीकडे वर्ग न करण्याची सुचना बँकेला देण्याची अंतिम मुदत नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवसाच्या आधी पर्यंत आहे. म्हणजेच 25 जुलै 2022 हा दिनांक आहे.
अधिसुचित क्षेत्रात, अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. गडचिरोली जिल्ह्याकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनामार्फत विमा कंपनीची नेमणुक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याकरीता भारतीय कृषि विमा कंपनी यांच्या संपर्काकरीता पत्ता हा मुंबई क्षेत्रिय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई- 400023 टोल फ्री क्रं. 1800 419 5004, ई-मेल : pikvima@aicofindia.com असा आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत सन 2022-23 साठी सर्वसाधारणपणे जिल्हास्तरीय पिक कर्ज दर समितीने निश्चित केलेले दराप्रमाणे विमा संरक्षित रक्कम व त्यानुसार विमा संरक्षित रकमेच्या 2 टक्के व नगदी पिकाकरीता 5 टक्के विमा हप्ता हा शेतकऱ्यांना भरावयाचा आहे.
विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता भात (तांदुळ) पिकाकरीता, अधिसुचित महसुल मंडळ यात जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळे असून विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर रुपये 45000/- याकरीता शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरीता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर (रुपये) 900/-, तसेच सोयाबिन पिकाकरीता अधिसुचित महसुल मंडळे हे बामणी (ता.सिरोंचा), मुलचेरा(ता. मुलचेरा), लगाममाल (ता. मुलचेरा), विमा संरक्षित रक्कम प्रती हे. (रुपये) 45000/- शेतकऱ्यांने सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर (रुपये) 900/- असेल. कापूस या पिकाकरीता अधिसुचित महसुल मंडळ हे अहेरी (ता.अहेरी), आलापल्ली (ता अहेरी) , जिमलगट्टा ( ता.अहेरी), खमनचेरु ( ता.अहेरी), कमलापूर ( ता.अहेरी), बामणी (ता.सिरोंचा), सिरोंचा (ता. सिरोंचा), पेंटिपाका ( ता. सिरोंचा), असरअल्ली (ता.सिंरोंचा), चामोर्शी (ता.चामोर्शी), येनापूर(ता.चामोर्शी),
आष्टी (ता.चामोर्शी), भेंडाळा(ता.चामोर्शी) हे असतील. कापसाकरीता विमा संरक्षित रक्कम प्रती हे. (रुपये) 50000/- असतील. शेतकऱ्यांनी सहभागी होण्याकरिता भरावयाचा विमा हप्ता प्रती हेक्टर (रुपये) 2500 रुपये असतील.
विमा संरक्षणाच्या बाबी यामधे प्रतिकुल हवामान घटकांमुळे पेरणी/लावणी/उगवण न होणे., हंगामातील प्रतिकुल परिस्थिती झालेले नुकसान. पिक पेरणीपासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट , स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान, इ. आहे.
योजनेमध्ये सहभाग घेणेसाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करतेवेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमाच्या अर्जासोबत पिक पेरा प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खाते पुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत खालीलपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र किंवा किसान क्रेडीट कार्ड किंवा नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनचालक परवाना.
खरीप हंगाम २०२२ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होणेसाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँकेचे कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क करावा. त्याच प्रमाणे, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमुद करावे लागणार आहे. या संदर्भात ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधारकार्ड नाही अश्या शेतकऱ्यांनी त्वरीत नजीकचे आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करुन नोंदणीची प्रक्रिया पुर्ण करावी.
अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणुन खरीप हंगाम २०१७ पासुन गावपातळीवर अधिकची सुविधा उपलब्ध करण्याचे कृषि विभागाचे नियोजन केले आहे. या करिता राज्यात कार्यान्वित “आपले सरकार सेवा केंद्र ” (डिजिटल सेवा केंद्र) सुविधा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे अर्ज भरण्याकारीता उपलब्ध करण्यात आले आहे.
तरी शेतकऱ्यांनी पिक विमा संरक्षण मिळणेस्तव प्रधानमंत्री पिक विमा योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी दिनांक ३१ जुलै २०२२ या अंतिम दिनांकापुर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
योजनेतील सहभागासाठी तत्काळ नजीकच्या उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी तसेच मंडळ कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांच्या तर्फे सर्व शेतकरी बंधूना करण्यात येत आहे.