प्रत्येक मागास, दर्लक्षित घटकांना बरोबर घेवून राज्य विकासाच्या मार्गावर : राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर

298

– राज्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान
The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे हस्ते गडचिरोली येथील ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राज्यमंत्री म्हणाले, प्रत्येक मागास, दर्लक्षित घटकांना बरोबर घेवून राज्य विकासाच्या मार्गावर असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागातही विकासाची गंगा वाहण्यास सुरूवात झाली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र निर्मितीमधील हुतात्म्यांना आदरांजली वाहून गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्रराज्य दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.दिलीप पांढरपट्टे, सचिव मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य, प्रभारी जिल्हाधिकारी धनाजी पाटील, पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, सोमय मुंडे, अनुज तरे, निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.आपल्या भाषणात राज्यमंत्री यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा देऊन उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव केला. त्यांनी यावेळी म्हटले की, गडचिरोली जिल्हा स्थापनेपासून आजपर्यंत अनेक आव्हानांना सामोरे जात इतर जिल्हयांच्या बरोबरीने विकासाला गवसणी घालीत आहे. राज्यातील प्रत्येक मागास, दर्लक्षित घटकांना बरोबर घेवून राज्य विकासाच्या दिशेने झेप घेत आहे. यासाठीच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातून सर्वसामान्यांना विविध योजनांमधून शासन मदत करीत आहे. गडचिरोली जिल्हा आदिवासी, दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्हयात आरोग्य सुविधांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जात. सद्या या प्रश्नावर प्रशासनाने मार्ग काढून जिल्हा रूग्णालयापासून ते ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या आहेत. नरेगातून गेल्या वर्षी ३०.३६ लक्ष मनुष्य दिनांची निर्मिती करण्यात प्रशासनाला यश आले. नुकताच जिल्हा प्रशासन आणि ग्रामसभांमध्ये सामंजस्य करार झाला असून आता वनाधारित सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट असणार आहे. हा करार एतिहासीक म्हणून जिल्हयात विकासाबरोबर वाटचाल करील.
नक्षल चकमकीत गेल्या वर्षी ४४ नक्षलवादी मारले गेले, ३४ नक्षलींना अटक तर ६ जणांचे आत्मसमर्पण झाले. ही आत्ता पर्यंतची सर्वांत यशस्वी कामागिरी ठरली. याबद्दल त्यांनी जवानांचे अभिनंदन केले. यानंतर पोलीस विभागाकडून परेड झाली.
यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्यांचा गौरव करण्यात आला. पोलीस विभागात उत्कृष्ठ कामगिरीबाबत पोलीस अधीक्षक, गडचिरोली अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, व अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचा सन्मान यावेळी मंत्री महोदय यांचे हस्ते करण्यात आला. तसेच गडचिरोली भारत स्काऊटस् आणि गाईडस् गडचिरोली लिडर ट्रेनिंग कोर्स पूर्ण केल्याबद्दल डॉ.बी.आर.आंबेडकर विद्यालय, वायगाव, ता.चामोर्शी येथील कालिदास लक्ष्मण बन्सोड यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. आदर्श तलाठी पुरस्कार सन 2021-22 चुरमुरा, ता. आरमोरी येथील तलाठी चंद्रशेखर निलकंठ बोकडे यांना प्रदान करण्यात आले. तसेच कृषि विभागाच्या शेतीशाळांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षणाबाबत कृषि सहाय्यक (वडसा), तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वडसा येथील श्रीमती कल्पना बाळकृष्ण ठाकरे यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी, सचिन अडसुळ यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here