प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या उपस्थितीत कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार वितरण संपन्न

250

– राज्यपालांच्या हस्ते दिलीप वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

The गडविश्व
मुंबई : प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्या उपस्थितीत कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार वितरण संपन्न झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू व क्रीडा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे काल रविवार २० मार्च रोजी राज्यपालांच्या हस्ते सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध कॉर्पोरेट्स व संस्थांना चौथे सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आले, त्यावेळी वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे व डॉ मंदाकिनी आमटे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, सीएसआर जर्नलचे मुख्य संपादक अमित उपाध्याय व सहव्यवस्थापक योगेश शहा यांसह विविध कॉर्पोरेट्स व सार्वजनिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशातील विविध लोकोपयोगी सामाजिक प्रकल्प राबविण्यात कॉर्पोरेट्स आपल्या सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून मोठे योगदान देत आहेत. काही कॉर्पोरेट्स कायद्यातील अनिवार्य तरतुदींना अनुसरून सामाजिक कार्यांसाठी योगदान देतात, मात्र अनेक संस्था त्याही पलीकडे जाऊन स्वखुशीने अधिक योगदान देतात. समाजाच्या विकासासाठी कॉर्पोरेट सामाजिक दायित्वापेक्षा देखील नागरिकांचे स्वतःचे सामाजिक दायित्व अधिक महत्वाचे आहे असे सांगून समाजकार्यासाठी संपूर्ण जीवन निःस्वार्थपणे समर्पित करणाऱ्या देवतुल्य व्यक्तींचा देखील सन्मान करण्यात यावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
करोना संसर्गाच्या काळात केवळ कॉर्पोरेट्स व मोठ्या संस्थांनीच नाही तर सामन्यात सामान्य व्यक्तीने देखील चांगले कामे केले असे सांगून राज्यपालांनी सर्व विजेत्या संस्थांचे अभिनंदन केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी जिंदाल स्टील व पॉवर, आयसीआयसीआय लोंबार्ड, महिंद्रा अँड महिंद्रा रूरल हाऊसिंग यांसह निवडक संस्थांना कॉर्पोरेट सामाजिक दायित्व पुरस्कार देण्यात आले. यावेळी सूत्र संचलन करणाऱ्या प्रसिद्ध तृतीयपंथी मॉडेल सुशांत दिवगीकर यांचा देखील राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तिन्ही सैन्यदलांचे माजी संयुक्त प्रमुख दिवंगत जनरल बिपीन रावत, भारतरत्न लता मंगेशकर व सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here