The गडविश्व
गडचिरोली : स्थानिक पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे उपस्थितीत मुक्तीपथ अभियान अंतर्गत पोलीस विभागाशी संबधित कामाची आढावा बैठक २६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली. या बैठकीला मुक्तीपथचे सल्लागार डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, सांख्यीकी अधिकारी गणेश कोळगिरे, १२ तालुक्याचे मुक्तीपथ तालुका संघटक, उपस्थित होते.
कोरोनाच्या समस्येमुळे दरम्यानच्या काळात बैठक होऊ न शकल्याने २६ फेब्रुवारीला ५-६ तास बैठक घेऊन मुक्तिपथ अभियान अंतर्गत वर्षभरात केलेल्या विविध कामाचा आढावा, अडचणी बाबत मुक्तीपथच्या तालुका संघटक यांचे कडून जाणून घेण्यात आला. यावेळी मुक्तीपथचे सल्लागार डॉ. मयूर गुप्ता यांनी पोलीस विभागाचा कृती आराखाडा या बैठकीत समजावून सांगितला. या कृती आराखड्यानुसार संबधित पोलीस निरीक्षक, पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे सोबत, मुक्तीपथ तालुका संघटक यांचे उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन आवश्यक सूचना दिल्या जाईल असे यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले. मुक्तिपथ टीमने यावेळी जिल्हाभरातील ठोक अवैध दारू विक्रेते व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांबाबत माहितीची मांडणी करत कारवाईची मागणी केली. तसेच गडचिरोली जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी जिल्हा सीमेवर पथकाच्या माध्यमातून तपासणी करणे, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक यांची दर महिन्याला मुक्तिपथ टीमसोबत बैठक घेऊन तालुक्यातील त्रासदायक गावांतील दारूविक्रेत्यांवर कारवाई करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यासोबतच अवैध दारूविक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी या व्यवसायातून बाहेर पडणाऱ्यांना किंवा दारू विक्रीचा व्यवसाय बंद करणाऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देत, इतर रोजगार त्यांनी करावा, या विषयावर सुद्धा बैठकीत चर्चा करण्यात आली.