पोलिस दादांना राखी बांधून महिलांनी मांडली व्यथा

258

– अवैध दारूविक्री बंद करून सुखी संसाराची ओवाळणी द्या
The गडविश्व
गडचिरोली, २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, एटापल्ली, कोरची, धानोरा, आरमोरी व गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये मुक्तिपथ अभियान व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने राखी विथ खाकी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध गावातील महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून आपली व्यथा सांगितली. तसेच अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करून तुमच्या बहिणीला सुखी संसाराची ओवाळणी द्या, अशीही विनंती केली.
अहेरी पोलिस स्टेशन येथे मुक्तिपथचे संचालक तपोजे मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत राखी विथ खाकी हा उपराक्म घेण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे, पीएसआय आरती नरोटे, मुल्ला, इतर पोलिस अधिकारी, कर्मचारी व मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते. सिरोंचा येथील एसडीपीओ कार्यालय व पोलिस स्टेशनचा संयुक्त रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १२ वार्डातील संघटनेच्या महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून शहरातील अवैध दारूविक्रीची सद्यस्थिती लक्षात आणून दिली. एटापल्ली पोलिस स्टेशन येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. याप्रसंगी १७ वार्डातील २० महिला सदस्यांनी पोलिस दादांना राखी बांधून शहरातील दारूबंदी व सर्वांच्या सुरक्षेची ओवाळणी मागितली. यावेळी एपीआय मंदार पुरी, पीएसआय काळे, पीएसआय ज्ञानेश्वर, अश्विनी नागरगोजे, तालुका संघटक किशोर मल्लेवार उपस्थित होते.
कोरची पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक अमोल फरतरे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शहरातील महिलांनी पोलिस बांधवाना राखी बांधून शहर दारूमुक्त करण्याची ओवाळली मागितली. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका संघटक निळा किन्नाके यांनी केले. धानोरा पोलिस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात शहरातील महिलांनी पोलिस बांधवाना राखी बांधून अवैध दारूविक्री बंद करून आमचे रक्षण करा, अशी ओवाळली मागितली. यावेळी पोलिस निरीक्षक देडे,पीएसआय गायकवाड, सिरसाट यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सोबतच धानोराचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांना राखी बांधून महिलांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडली.
आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक काळबांधे यांच्या प्रमुख उपस्थितीत राखी विथ खाकी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांनी पोलिस बांधवाना राखी बांधून आमचा तालुका दारूमुक्त करा व आपल्या बहिणीचे संसार सुखी करण्याची विनंती केली. गडचिरोली पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या अध्यक्षतेखाली रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी दिभना, इंदाळा, मेंढा, मूडझा, खरपुंडी, सालयीटोला , गोगाव, लांझेडा व शहरातील २१ महिलांनी पोलिस बांधवाना राखी बांधून गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीकडे लक्ष वेधले. यावेळी बिट अंमलदार भेंडाळे, गुरनुले, शिवदास दुर्गे, यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन तालुका संघटक अमोल वाकुडकर व स्वीटी आखरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here