– दोघांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथील दोन दारूविक्रेत्यांच्या घरातून चार ड्रम गुळाचा सडवा जप्त करीत दोघांवर गुन्हा दाखल केल्याची कारवाई सिरोंचा पोलिस, गाव संघटन व मुक्तिपथ तालुका चमूने केली.
पोचमपल्ली येथे अवैध दारूविक्री बंद होती. मात्र मागील काही महिन्यांपासून चोरट्या मार्गाने दारूविक्रीचा अवैध व्यवसाय केला जात आहे. गावातील दोन घरी दारू काढण्यासाठी गुळाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे सिरोंचा पोलिसांनी मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिलांच्या उपस्थितीत दोन घरांची तपासणी केली. दरम्यान एका घरी २ व दुसऱ्या घरी २ ड्रम असा एकूण जवळपास २८ हजार रुपये किंमतीचा गुळाचा सडवा आढळून आला. संपूर्ण माल नष्ट करीत दोन्ही दारूविक्रेत्यांवर सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार राजू चव्हाण व पोलिस पथकाने केली. यावेळी गाव संघटनेच्या महिला व मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.