– सावली पोलिसांची कारवाई
The गडविश्व
सावली : पेट्रोल पंपावरील डिझेल चोरी प्रकरणी २४ तासात आरोपी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात सावली पोलिसांना यश आले आहे. काशीनाथ उर्फ विजय दिलीप हत्ते (२४) रा.आलमडा ता.औसा जि.लातूर, पिंटू पोपट पवार (३४) रा.येरमळा ता.कळंब जि.उस्मानाबाद अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार पोलीस स्टेशन सावली हद्दीतील व्याहाड ते गडचिरोली मार्गावरील चुनारकर पेट्रोल पंप येथे 29 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी पेट्रोल पंपावरील डिझेल टँक मधील १ हजार ८१ लिटर डिझेल चोरी केल्याचे पेट्रोल पंप मालकास लक्षात आले. तसेच रोहणकर पेट्रोल पंपावरून २७ मार्च रोजी च्या रात्रो अशाच प्रकारे १ हजार ६४० लिटर डिझेल चोरी झाल्याचे रोहनकर पेट्रोल पंप मालकास लक्षात आले. दोन्ही प्रकरणात एकूण २ हजार ७२१ लिटर डिझेल किंमत २ लाख ६७ हजार २३४ रुपयांचा डिझेल चोरी झाल्याप्रकरणी पेट्रोल पंप मालकांनी १ एप्रिल रोजी अज्ञातांविरुद्ध पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याच्या तपासात स्वतःहून तांत्रिक मदतीने तसेच प्राप्त माहितीच्या आधारे रात्रो दरम्यान गडचिरोली रोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोलिंग करत पाळत ठेवली. २ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास चुनारकर पेट्रोल पंप परिसरात बोलेरो वाहन संशयित रित्या उभे दिसून आले त्यात असलेल्या २ इसमांना ताब्यात घेऊन कसोशीने विचारपूस केली. यावेळी दोघांनीही आपण रात्रोच्या सुमारास दोन्ही पेट्रोल पंपावरून पेट्रोल चोरी केल्याचे कबूल केले. तसेच या दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच बाहेर फिरत असलेले या आरोपींची इतर सहकारी पसार झाले. त्यांनी कबूल केलेल्या पेट्रोल चोरी प्रकरणी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, पोलीस स्टेशन सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशीकर चिचघरे, सहाय्यक फौजदार रामकिसन बोधे, नापोका केवल तुरे, करमचंद दुर्गे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज पीटूरकर यांनी केली.