पुजेचे मूळस्थान श्रीगुरूचरण !

375

आषाढी पौर्णिमा- गुरुपौर्णिमा विशेष

गुरूदर्शन व गुरूपूजा करण्याच्या हेतूने आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला गुरुपौर्णिमा आणि व्यास पौर्णिमा म्हटले जाते. वेद व्यास यांना प्रथम गुरुचा दर्जा देण्यात आलेला आहे कारण त्यांनी संपूर्ण मानव जातीला चार वेदांचे ज्ञान दिले आहे. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती होय. गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवापेक्षाही श्रेष्ठ मानले जाते. कारण सद्गुरू हेच परमात्म्याचे सगुण साकार रुप असते. म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरुपूजन केले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरूपुजेला सर्वच धर्मात अनन्यसाधारण महत्त्व सांगितले आहे. बौद्ध धम्मात तर हजारो वर्षांपासून गुरूपुजेला विशेष स्थान दिलेले आढळून येते. गुरूचा अर्थच अगदी मस्तकात लख्ख प्रकाश पाडणारा प्रतित होतो. गु म्हणजे काळोख तर रू म्हणजे प्रकाशपुंज होय. सद्गुरु लाभला तर ईश्वरप्राती झाली आणि गुरुला पुजता परमेश्वर प्रसन्न झालाच म्हणून समजा. तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतोच-
“गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥”
हिंदू धर्मात तसे तर सगळ्या पौर्णिमा त्याच्या त्याच्या खास महत्वांनी परिचीत आहेत. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते आणि होम, जप, तप, दान, धर्म यांसाठी खास तिथी मानली जाते. गुरुमंत्र प्राप्त करण्यासाठी देखील हा दिवस फार महत्वाचा ठरतो. या दिवशी आपण ज्यांना आपला गुरु मानतो त्यांचा आदर करावा आणि त्यांना नमस्कार करावा. कारण त्यांनी दिलेल्या ज्ञानातून आपल्या जिवनातला अंधकार नष्ट झालेला असतो आणि गुरुद्वारे भगवंताची प्राप्ती होते. गुरुंनी दिलेल्या ज्ञानाच्या भंडारातूनच आपण जिवनातील प्रत्येक मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करतो. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत गुरु-शिष्यांची ही परंपरा सुरू आहे. या दिवशी फक्त गुरुंनाच नव्हे तर घरातील प्रत्येक ज्येष्ठ सदस्य, आईवडील आणि आपल्या जीवनात कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येकाला गुरुचा दर्जा देत त्यांचे आभार मानावे, त्यांना नतमस्तक व्हावे. सन्मार्ग आणि परमार्थ प्राप्तीचा गुरोपदेश करताना तथागत गौतम बुद्ध किसीलसुत्तात म्हणतात, की गुरुभेटीचा क्षण जाणा व संधी न गमावता आदरपूर्वक गुरूमुखातून येणारे धार्मिक कथन ऐका. निगर्वीपणे विनम्र होऊन योग्य वेळी गुरूपाशी जावे. सदर्थ, धर्म, संयम व ब्रह्मचर्य यांचे स्मरण ठेवून ती आचरावीत- सुत्त निपात: ३२४ व २२६-
“वृद्धापचायी अनुसुय्यको सिया। कालञ्चऽस्स गरुनं दस्सनाय।।
धम्मिकथं एजयितं खणञ्जू। सुणेय्य सक्कच्च सुभासितानि।।
कालेन गच्छे गरुनं सकासं। थंभं निरंकत्वा निवातवुत्ति।।
अध्य धमं संयम ब्रह्मचयरिया। अनुस्सरे चेव समाचारे चा।।”
ज्या गुरूद्वारे ईश्वरप्राप्ती होते, त्यास सद्गुरू असे म्हणतात. तो संपूर्ण मानवांच्या व जगताच्या कल्याणासाठी अर्थात केवळ परोपकार करण्यासाठी अवतरित होत असतो. त्याने दिलेले ब्रह्मज्ञान हे दिव्यज्ञान असते. शिष्य जसा त्याचा वापर करेल तसा त्याचा परिणाम त्याच्या जीवनात दिसून येईल. तप्त लोहाच्या गोळ्याप्रमाणे ते असते. त्यापासून सुईसारखे हत्यार घडविल्यास ते जोडण्याच्या कामी पडते. तर सुरी घडविल्यास ती तोडते. सद्गुरूला मात्र मनाशी मने व माणसाशी माणसे जोडणारा शिष्य अपेक्षित असते. तेव्हाच ब्रह्मज्ञान सत्कारणी लागले, असे म्हणता येते, अन्यथा नाही. तप्त लोहगोळ्यावर काहीच प्रक्रिया केली नाही तर तो थंड होऊन निरुपयोगी ठरतो. अगदी तसेच या ब्रह्मज्ञानाचे सुद्धा आहे. म्हणून त्याचा उपयोग जनकल्याण साधन्याच्या कामी केला पाहिजे. स्वार्थापेक्षा परमार्थ अधिक पटीने साधला पाहिजे. शिष्याने आपल्या दैनंदिन जीवनात चुकल्या-माखल्याची क्षमायाचना या गुरूपूजेच्या पावन समयी केली पाहिजे. कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात-
“सद्गुरूवांचोनि सापडेना सोय!
धरावे ते पाय आधी आधी!!”
ब्रह्मज्ञान मिळाल्यावरच खऱ्या भक्तीला सुरवात होत असते, अन्यथा पालथ्या घड्यावरचे पाणी ठरते. आपल्या भक्तीला नटवण्या-थटवण्याचे काम आपले सत्कर्म करीत असतात. तर आपल्या भक्तीला बदनाम व वाया दवडण्याचे काम आपले दुष्कर्म करतात. म्हणून दुष्कर्मांचा अव्हेर केला पाहिजे. समोरचे मनोहारी दृश्य बघण्यासाठी लोक गर्दी करतात. अशावेळी आई बाळाला कडेवर घेत असते. तर वडील मुलाला खांद्यावर घेत असतात. याबाबत त्यांना प्रश्न केले, की असे का? तर ते कृपाळू मायबाप मोठ्या महत्वाकांक्षेने सांगत असतात, की आपण जे पाहू शकलो नाही. ते आपल्या लाडक्या मुलांनी पाहावे. आहे की नाही हे नवल? किती हे औदार्य, किती ही दया! मायबापांची जशी अपेक्षा व महत्वाकांक्षा तशीच सद्गुरूची पण असते. मायबापांनी कड्या-खांद्यावर घेतलेल्या मुलांनी मात्र अपेक्षेप्रमाणे जे डोळ्यांत साठवायचे आहे, नेमके तेच दृश्य साठवले पाहिजे. तरच ते कष्ट सार्थकी ठरले म्हणावे. जर मुलांनी लोकांचे काळे-गोरेपणा, साधे-झकपक पोषाख, काळे-पांढरे केस आदी गोष्टीच न्याहाळत राहिले. तर मात्र मायबापांचे परिश्रम, इच्छा व महत्वाकांक्षा पार धुळीस मिसळून गेले की हो! यशस्वी जीवनात अशा मौलिक संधी आणि उपलब्धता या केवळ गुरूद्वारे मिळालेल्या ज्ञानामुळे शक्य झाले. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरूला नमन करण्याचा, गुरू पूजन करण्याचा हा गुरुपौर्णिमा सण आहे. ज्याला गुरू नाही, असा मनुष्य जगात शोधूनही सापडणार नाही. गुरू सहजच कितीतरी मिळतात, मात्र सद्गुरू सदसद्विवेक बुद्धी जागृत ठेऊन मिळवावा लागतो. संतशिरोमणी अवतारसिंहजी महाराज समजावतात- सम्पूर्ण अवतारबाणी: पद क्र. १४१- ओवी ९ व १० वी-
“रीझ जाय यदि सद्गुरू अपना रीझ गया समझो भगवान!
कहे ‘अवतार’ गुरु कृपा से कण मिट्ट का गगन समान।”
खरे गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द शिरसावंद्य मानून त्यावर चालणे म्हणजे खरे गुरुपूजन! खरे तर गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, गुरूगीतेत म्हटलेच आहे-
“ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्। मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥”
!! गडविश्व परिवारातर्फे गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व बंधुभगिनींना हार्दिक शुभेच्छा !!

अलककार- श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे.
(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)
रामनगर- गडचिरोली. मधुभाष- ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here