– दारूविक्रेत्यांना नोटीस
The गडविश्व
गडचिरोली, ७ सप्टेंबर : चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथील महिलांनी अवैध दारूविक्री विरोधात एल्गार पुकारला आहे. महिलांनी गावातून रॅली काढत गावातील दारूविक्रेत्यांना नोटीस बजावून अवैध व्यवसाय बंद करण्याचे ठणकावून सांगितले आहे.
चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा या गावाला घनदाट जंगलाने व्यापले असून आजही गावात पुरातन किल्ल्याचे अस्तित्व आहे. अनेक वर्षांपासून या गावात दारूबंदी होती. मात्र, मागील २-३ वर्षांपासून काही लोकांनी अवैध दारूविक्रीचा व्यवसाय सुरु केला. दरम्यान, ३० ऑगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत मुक्तिपथचे तालुका उपसंघटक आनंद सिडाम यांनी महिलांना दारूच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. तेव्हा महिलांनी अवैध दारूविक्रीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती दिली. तसेच महिलांनी दारूबंदीचा ठराव पारित केला. अशातच गावात रॅली काढून गावातील दारूविक्रेत्यांच्या घरोघरी भेट देऊन अवैध व्यवसाय बंद करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आले. तसेच यापुढे दारूविक्री सुरूच ठेवल्यास कडक कारवाई करण्यात येईल, अशीही ताकीद देण्यात आली.