पर्यावरण संवर्धनासाठी ‘अंकुर’ शिबिरात १०० वृक्षांची लागवड

238

The गडविश्व
चिमूर (भिसी) : लहान मुलांमध्ये पर्यावरणविषयी जागरुकता निर्माण व्हावी व त्यांच्यामध्ये निसर्गप्रेम रुजावे, या दृष्टिकोनातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अंकुर शिबिरार्थी यांच्या हस्ते १०० वृक्ष लागवडीचा व मार्गदर्शनाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी भिसी वनक्षेत्राचे वनरक्षक अमोल झळके, अंकुर मास्टर सुधाकर चौखे, ब्राईटएज फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे, निरीक्षक अक्षय शंभरकर उपस्थित होते.
ब्राईटएज फाउंडेशन, भिवापूर च्या वतीने लहान मुलांसाठी अंकुर या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना नवोदय, सैनिक स्कूल व इतर स्कॉलरशिप परीक्षांची तयारी करून घेण्यात येत आहे. सोबतच मुलांचा परिपूर्ण व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी विविध मानवी मूल्यांची रुजवणूक व्हावी, या दृष्टिकोनातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मुलांची जागतिक हवामान बदल या प्रमुख समस्येशी ओळख व्हावी. या समस्येवर मात करण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजनांची माहिती त्यांना मिळावी, हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी उपस्थित असलेले अमोल झळके यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी पर्यावरण दिनाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. सोबतच वृक्षारोपणाचे महत्त्व विषद करत पर्यावरणातील प्रत्येक सजीव निर्जीव घटकाचे संवर्धनाच्या आवश्यकतेविषयी मत व्यक्त केले. पोषक अन्न, शुद्ध पाणी व हवा याशिवाय मानव जगू शकत नाही. त्यामुळे निसर्गाची काळजी घेणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमादरम्यान अंकुरच्या मुलांनी पर्यावरण या विषयावर सुंदर नृत्य केले. यावेळी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण या उपक्रमाची सुरुवात करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. मार्गदर्शन कार्यक्रमानंतर लहान मुलांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक चौखे तर आभार विलास चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here