पत्रकारांनी समाजातील चांगल्या कामांना ओळख मिळवून द्यावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

243

The गडविश्व
मुंबई : समाजातील उणिवा व दोष शोधणे हे पत्रकारांचे काम आहे. मात्र, हे काम करीत असताना समाजातील चांगल्या कामांना देखील पत्रकारांनी ओळख मिळवून द्यावी. पत्रकारांनी दिलेली ओळख व शाबासकी समाजाला अधिक चांगले कार्य करण्यास निश्चितपणे प्रोत्साहन देईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्य करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे पत्रकार भूषण, जीवन गौरव, आदर्श प्रशासक, साहित्य रत्न, समाज भूषण व इतर पुरस्कार राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते आज राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, उपाध्यक्ष शंकर रहाणे, सचिव श्रीकांत चाळके व विविध पुरस्कारांचे मानकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाने केवळ पत्रकारांचा सन्मान न करता समाजातील निरनिराळ्या क्षेत्रातील गुणवंत लोकांचा सत्कार केल्याबद्दल संघाचे अभिनंदन करताना राज्यपाल म्हणाले नैतिक मूल्ये, त्याग, प्रेम व सद्भावना या गुणांमुळे समाजाला जिवंतपणा असतो. या गुणांचा अंगीकार करून देशाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.
लोकशाहीत पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. सामान्य माणसाला पत्रकार हा मोठा आधार असतो, असे श्री.संजय केळकर यांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी एकमतचे संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार देण्यात आला, तर सकाळचे राहुल क्षीरसागर, लोकमतचे अजित मांडके, जीवदानी टाइम्सचे उमेश तरे यांना पत्रकार भूषण पुरस्कार देण्यात आले.
महिला प्रशासक उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे तसेच ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांना आदर्श प्रशासक पुरस्कार देण्यात आला. वसमत, हिंगोली येथील भगवान देशमुख यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला, तर व्यंकटेश काटकर व डॉ.हंसराज वैद्य, वजिराबाद, नांदेड यांना साहित्य रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here