नक्षलग्रस्त भागातील पोलीसांना दीडपट वेतन व महागाई भत्ता मिळणार, शासन निर्णय जारी

983

– उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेला शब्द पूर्ण केला
The गडविश्व
गडचिरोली-मुंबई, ३ ऑक्टोबर : नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी (पोलीस जिल्हा) व गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील भागात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी कर्मचारी दीड पट वेतनापासून वंचित होते. दीड पट वेतन मिळावे अशी मागणी होती, नुकतेच उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर आले असता  जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या पोलीसांच्या दीड पट वेतनाबाबत विचारणा केली असता सोमवारी शासन निर्णय जाहीर होईल असा शब्द दिला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून नक्षलग्रस्त भागातील पोलीसांना दीडपट वेतन व महागाई भत्ता आता मिळणार आहे. तसे शासन निर्णय गृह विभागाच्या वतीने जारी करण्यात आले आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी (पोलीस जिल्हा) व गोंदीया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या (राज्य राखीव पोलीस दल, ,बिनतारी संदेश विभाग, मोटार परिवहन विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाहतूक विभाग, विशेष कृती दल, नक्षल विरोधी अभियान, राज्य गुप्त वार्ता विभाग इत्यादी सह) पोलीस अधिकारी/कर्मचारी यांना अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील उद्देशिकेतील अनुक्रमांक (४) येथील १८/२/२०११ च्या शासन निर्णयाद्वारे निश्चित करण्यात आलेल्या पोलीस ठाणी / पोलीस उपठाणी/ सशस्त्र दुरक्षेत्रे व कार्यालयामध्ये कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांना अनुज्ञेय असलेल्या मूळ वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा. म्हणजेच राज्यातील पोलीस दलाच्या विविध शाखांचे अधिकारी / कर्मचारी अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत / तैनात असेपर्यंत त्यांना करावे लागणारे जोखमीचे काम विचारात घेता कार्यरत कालावधीसाठी मिळत असलेल्या अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता देण्यात यावा.
राज्य गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांना एकस्तर पदोन्नतीचा लाभ ते राज्यात कोठेही कार्यरत असले तरी अनुज्ञेय आहे. तथापि गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप अत्यंत जोखमीचे आहे. यामुळे या जिल्ह्यात अतिसंवेदनशील भागात कार्यरत असलेल्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारी / कर्मचारी यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने एकस्तर पदोन्नतीचा लाभ किंवा अतिसंवेदनशील पोलीस ठाणी/पोलीस उप ठाणी / सशस्त्र दूरक्षेत्र येथे कार्यरत अधिकारी/ कर्मचाऱ्यांप्रमाणे अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने वेतन अधिक महागाई भत्ता यापैकी जे जास्त असेल ते देण्यात यावे.
राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या गडचिरोली, अहेरी, गोंदिया जिल्ह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत आहेत. यास्तव अतिसंवेदनशील क्षेत्रात जे कार्यरत असताना त्यांनाही अनुज्ञेय वेतनाच्या दीडपट दराने मूळ वेतन अधिक महागाई भत्ता देण्यात यावा. राज्य राखीव पोलीस बलातील अधिकारी / कर्मचारी उक्त संवेदनशील भागात कार्यरत असतील तोवरच त्यांना दीडपट दराने अनुज्ञेय वेतन व महागाई भत्ता लागू राहील.
नक्षलग्रस्त भागात कार्यरत संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना सामान्य प्रशासन विभागाकडून नक्षलग्रस्त भागात कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना लागू केलेल्या इतर आर्थिक सवलती अनुज्ञेय असणार नाहीत. सदरची बाब संबंधित अधिकाऱ्यांनी विचारात घेऊन त्याप्रमाणे वेतन अदा करावे.
याबाबत येणाऱ्या वेतन व महागाई भत्त्यावरील अधिकचा खर्च या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात येतात, त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व तो मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा. तसेच हे आदेश १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीच्या वेतनभत्त्यासाठी लागू राहतील. असे शासन निर्णयात जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here