The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ८ नोव्हेंबर : शिखांचे पहिले गुरू श्री गुरु नानक देवजी यांची ५५३ वी जयंती उत्सव ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी धानोरा येथील केंद्रिय राखिव बल तुकडीत उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री गुरु नानक देवजी यांचा जन्म १५ एप्रिल १४६९ रोजी रायभोई येथील तलवंडी नानकाना साहिब येथे झाला. जो सध्या पाकिस्तानात आहे. गुरु नानक देव यांची जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. शीख समाजातील लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवसाला प्रकाश पर्व आणि गुरु पर्व असेही म्हणतात. गुरु नानक देव जयंतीनिमित्त गुरुद्वारांमध्ये सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रार्थना आणि दर्शनाचा कालावधी असतो. नगर कीर्तनांचे आयोजन केले जाते. गुरु नानक जयंतीच्या दिवशी आयोजित केलेल्या सभांमध्ये गुरू नानक देव यांनी दिलेल्या शिकवणी सांगितल्या जातात आणि गुरु ग्रंथ साहिबचे पठण केले जाते. लोक गुरु नानक देवजींचा जन्मदिवस आनंदाने साजरा करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात.
११३ बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दल धानोरा, गडचिरोली येथे ११३ बटालियन कमांडंट श्री जसवीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली गुरु नानक देव यांची ५५३ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली व प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने ११३ बटालियनच्या प्रांगणात भंडारा आयोजित करण्यात आला होता ज्यात सर्व अधिकारी व जवानांसह जवळपासच्या मान्यवरांनीही सहभाग घेतला होता.
