The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २१ नोव्हेंबर : महसूल मंडळ कर्मचारी लोकांना निवासाची सोय व्हावी यासाठी शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून जुन्या तहसील कार्यालय शेजारी महसूल निवासस्थाने बांधली आहेत. सदर इमारतीचे हस्तांतरण होण्यापूर्वीच सामानाची चोरी झाल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
दिवाळी मध्ये जिल्हा परिषद शाळेतील साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले हि घटना उलटून १०दिवसातच दुसरी घटना समोर आली आहे. यावरुण तरी धानोरा शहरात चोरांचा सुळसुळाट असल्याचे स्पष्ट दिसते.
जुन्या तहसील कार्यालयाच्या बाजूला लागुन असलेल्या भागात महसूल कार्यालयात काम करणाऱ्या लोकांकरीता दोन इमारतीचे काम सुरू होते. त्या पैकी एका इमारतीचे काम पाच वर्षांपूर्वी झाले आहे. तिथे कोणताही चौकिदार नसल्याने हि चोरी झाली आहे. मात्र इमारतीचे हस्तांतरण झाले नाही आणि इमारतीमधील सामान चोरट्याने लंपास केले आहे. चोरी झालेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे ती इमारत दोन मजली आहे. या ठिकाणी जवळपास १२ निवासस्थाने आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत हे बांधकाम करण्यात येत आहे. सदर इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराने निवासस्थानाचे रंगरंगोटी करून आवश्यक साहित्य बसविले. मात्र अज्ञात चोरट्यांनी यातील साहित्य पळवून नेले. ही इमारत गावाबाहेर जंगलाला लागू असल्याने
या ठिकाणी रात्री कोणीही जाउ शकत नाही. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी लावलेले दरवाजे, तावदाने, लोखंडी ग्रील, जिन्याचे ग्रील यासह इतर सामानांची चोरी केली. दुसऱ्या इमारतीचे फक्त कॉलम उभे करून ठेवले आहे.
धानोरा तालुक्यात भुरट्या चोरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. काहि दिवसांपूर्वी नळाची पाईपलाईन कापुन नेल्याची घटना समोर आली होती, त्यानंतर शाळेचे साहित्य लंपास केले आणि आता महसुल मंडळाच्या इमारतीचे साहित्य चोरून नेले. दिवाळीच्या कालावधीत येथील जिल्हा परिषद हायस्कूल मधील सामान चोरट्याने चोरून नेले, शासकीय कार्यालय गावाच्या बाहेर आहेत या परिसरात रात्री कोणीही जात नाही आणि याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे दिसून येत आहे.