– धानोरा तालुक्यातील बांधोणा येथील घटना
The गडविश्व
ता.प्र / धानोरा २ जुलै : उत्तर धानोरा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मुस्का उपक्षेत्रातील बांधोना गावातील महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवार १ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. श्रीमती. प्रेमीला शामराव किरंगे असे जखमी महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, महिला ही सकाळच्या सुमारास जंगल परिसरात शौचास गेली असता जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याचे कळते. दरम्यान यावेळी महिलेनेही प्रतिकार केला व सोबत असलेले २ कुत्रे बिबट्यावर तुटून पडले. यावेळी बिबट्याने महिलेला सोडून जंगलात धूम ठोकली. नशीब बलवत्तर कुत्र्यांमुळे सदर महिलेचे प्राण वाचले आहे. या हल्ल्यात सदर महिला ही गंभीर जखमी झाली असून चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत.
घटनेची माहिती होताच वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत मेडेवार, मुस्का चे क्षेत्र सहाय्यक कु.करेवार, प्रवीण मेश्राम, वनरक्षक विकास कुमरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी महिलेची विचारपूस करून उपचाराकरीता प्राथमीक आरोग्य केंद्र आरमोरी येथे हलविले परंतु महिला गंभीर स्वरूपात जखमी असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. जखमी महिलेस उत्तर धानोरा वनपरीक्षेत्र अधिकारी वसंत मेडेवार यांनी उपचाराकरीता सानुग्रह मदत दिली आहे.
सदर घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.