धक्कादायक : एकाच कुटुंबातील ३ चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची मृत्यूशी झुंज सुरू

954

– जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय
The गडविश्व
बीड : एकाच कृटुंबातील तीन भावंडांचा मृत्यू झाला तर आईची मृत्यूशी झुंज सुरू असल्याची घटना बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वागझरी गावात घडली. साधना धारासुरे (६) , श्रावणी धारासुरे (४) आणि मुलगा नारायण (८ महिने) असे विषबाधेने मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. तर भाग्यश्री धारासुरे (२८) असे त्यांच्या आईचे नाव आहे. भाग्यश्री यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विषबाधेने मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे परंतु अद्याप मृत्यूचे कारण कळू शकले नाही. तर शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण कळणार आहे.
वागझरी येथील काशिनाथ धारासुरे यांनी आपल्या कुटुंबासह काल रात्रोच्या सुमारास घरी जेवण केले होते. त्यानंतर सकाळी साधना, श्रावणी आणि आठ महिन्याच्या नारायण यांना त्रास होऊ लागला. त्यासोबत पत्नी भाग्यश्रीची देखील तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून तिन्ही बालकांनी आणि कुटुंबीयांनी रात्री जे जेवण घेतले होते, त्याचे नमुने तपासण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावासह बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here