देसाईगंज तालुक्यात कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा देण्याच्या निर्णयाला हरताळ

195

विज वितरण कंपनिचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

THE गडविश्व
देसाईगंज : तालुक्यातील शेतकऱ्यांनी ५ जानेवारी रोजी कृषी पंपाना २४ तास सुरळीत विज पुरवठा देण्या संदर्भात महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाला शेकडोच्या संख्येने धडक दिली असता कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २४ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र एक दिवस लोटत नाही तोच वीजपुरवठा पुर्ववत खंडीत करुन ८ तासच देण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येऊ लागल्याने दिलेल्या आश्वासनाला कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच हरताळ फासल्याने एकुणच कंपनीचा भोंगळ व मनमानी कारभार पुरता चव्हाट्यावर आला असुन यामुळे मात्र शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.
दरम्यान ही बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी महावितरण कंपनी गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अभियंता व देसाईगंजचे शाखा अभियंता यांना ८ तास वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावरुन चांगलेच धारेवर धरले असुन दिलेल्या पत्रानुसार ९ जानेवारी पर्यंत तोडगा काढण्यात न आल्यास १० तारखेला उपविभागीय कार्यालया समोर चक्काजाम आंदोलनासह ठिय्या आंदोलन करण्याचा गर्भित इशारा दिला असल्याने संबंधित विभागात चांगलीच खळबळ माजली आहे.
देसाईगंज तालुक्यात कृषी वाहिनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विज पुरवठा करण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांना उन्हाळी धान फसलीच्या ओलितासाठी विजेची सक्त गरज असुन कंपनी तर्फे फक्त ८ तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याने ओलिताची गंभीर समस्या निर्माण झाली असुन यामुळे वापलेले पऱ्हेही कोमेजण्याच्या मार्गांवर आहेत.
खरीप हंगामात झालेला अवकाळी पाऊस,गारपिट तद्नंतर झालेल्या मावा तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड घट आल्याने अधिकच अडचणीत आले आहेत.यातुन सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन सुविधेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान लागवडीची तयारी केली असुन कृषी पंपाना सुरळीत विद्युत पुरवठेची गरज आहे. असे असतानाच महावितरण कंपनीकडून मात्र ८ तासच विद्युत पुरवठा करण्यात येत असल्याने याच मुद्द्याला घेऊन एकतर २४ तास वीजपुरवठा करा,अन्यथा विज पुरवठाच बंद करा अशी टोकाची भूमिका घेऊन ५ जानेवारी २०२१ रोजी कंपनीच्या उपविभागीय शाखा अभियंतांना तालुक्यातील शेकडोच्या संख्येने शेतकऱ्यांनी घेराव घातले होते.
दरम्यान देसाईगंज विद्युत वितरण कंपनिचे उपविभागीय शाखा अभियंता सारवे यांनी २४ तास सुरळीत विज पुरवठा देण्याचे आश्वासित करुन घालण्यात आलेल्या घेरावातुन सुटका करवून घेतली.मात्र एक दिवस लोटत नाही तोच तालुक्याच्या पोटगाव फिडर, विसोरा फिडर व इतरही फिडर अंतग॔त येणाऱ्यां गावातील विद्युतपुरवठा पुर्ववत ८ तासच सुरु ठेवला असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.
ही बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले असता वरीष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापी आमदार गजबे यांनी ५ जानेवारी रोजी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दिलेल्या पत्राची आठवण करुन देत ९ जानेवारी पर्यंत तोडगा काढुन २४ तास सुरळीत विज पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास १० जानेवारी २०२२ रोजी देसाईगंज विज वितरण कंपनिच्या उपविभागीय कार्यालया समोर चक्काजाम आंदोलनासह ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी कुणाच्याही भुलथापेला बळी न पडता आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here