– सिरोंचा पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील अमरावती गावातील विविध ठिकाणी धाड टाकून देशी दारूसह ९८ हजार ९०० रुपयांचा गुळाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई सिरोंचा पोलिस, मुक्तिपथ तालुका चमू व गावसंघटनेने संयुक्तरीत्या गुरुवारी केली. याप्रकरणी तीन दारूविक्रेत्यावर सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या अमरावती येथे अवैध दारूविक्री केली जाते. प्राप्त माहितीच्या आधारे सिरोंचा पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने गावातील विविध तीन दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून ९८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला . यामध्ये १३० टिल्लू देशी दारू, ८ ड्रम गुळाचा सडवा व साहित्यांचा समावेश आहे. याप्रकरणी तीन दारूविक्रेत्यांवर सिरोंचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गावातील व परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बिट अंमलदार राजू चव्हाण व त्यांच्या पथकाने केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.