-स्थानिक गुन्हे शाखा व मुक्तिपथची कारवाई
THE गडविश्व
गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील खुदिरामपल्ली शेतशिवारात धाड टाकून दारूसह २ लाख २४ हजारांचा मोहफुलाचा सडवा नष्ट केल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व मुक्तिपथने संयुक्तरित्या गुरुवारी केली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजीत शांतीपद रॉय, शांतीपद बुद्धीमंत रॉय दोन्ही रा. श्रीनगर असे आरोपींचे नाव आहेत.
खुदिरामपल्ली शेतशिवारात श्रीनगर येथील दारूविक्रेते हातभट्टी लावून दारू गाळत असल्याची गुप्त माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व मुक्तिपथ तालुका चमूने शेतशिवारात शोधमोहीम राबविली. दरम्यान दारू गाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहफुलाचा सडवा टाकून ठेवल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळावर २ लाख १० हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा व १४ हजार रुपयांची दारू असा एकूण २ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. याप्रकरणी रंजीत शांतीपद रॉय व शांतीपद बुद्धीमंत रॉय या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निलकंठ पेंदाम, संजय चक्कावार, पुष्पा कन्नाके, मंगेश राऊत, मुक्तिपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, श्रीनगरचे पोलिस पाटील आशा मुजुमदार, खुदिरामपल्ली चे पोलिस पाटील सविता बर्मन यांनी केली.