– सूचनेचे पालन न केल्यास होणार कारवाई
The गडविश्व
गडचिरोली,११ जुलै : कोरची तालुक्यातील बोरी मुक्तिपथ ग्रामपंचायत समितीने गावातील विक्रेत्यांना अवैध दारू विक्रीचा व्यवसाय तत्काळ बंद करण्याच्या तोंडी सूचना दिल्या आहेत.
बोरी गावात अवैध दारूविक्री केली जात असून व्यसनाच्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच बोरी, गहाणेगाटा, हुडुकधुमा गावातील गावसंघटन व मुक्तीपथ ग्रापं समिती पुनर्गठित करण्यात आली. या समितीने गावातील अवैध व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, गावातील काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवल्याने ग्रापं समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विक्रेत्यांची भेट घेतली व गावात पुन्हा दारूविक्री करायची नाही, अशी तंबी दिली. तसेच समितीच्या निर्णयाला न जुमानता दारूविक्री केल्यास कायदेशीर मार्गाने पोलिसांच्या मार्फतीने कारवाई करण्यात येईल, असेही ठणकावून सांगितले. यावेळी सरपंच सावजी बोगा, ग्रामसेविका आत्राम, पोलीस पाटील जयश्री कड्याम, ग्रापं सदस्य, गावसंघटन सदस्य, शिक्षक वृंद, तालुका संघटक निळा किन्नाके व गावकरी उपस्थित होते.