दादा, शहरातील व गावातील अवैध दारूविक्री बंद करा

217

– विविध ठिकाणी राखी विथ खाकी उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १६ ऑगस्ट : जिल्ह्यातील विविध शहर व गाव संघटनांच्या वतीने चामोर्शी, कुरखेडा, पोटेगाव, एटापल्ली व भामरागड पोलिस ठाण्यात ‘राखी विथ खाकी’ हा उपक्रमाअंतर्गत रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी गाव संघटनांच्या महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून आमच्या सुखी संसारासाठी शहरातील व गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी मागितली.
चामोर्शी पोलीस स्टेशन मध्ये पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक व जवानांना शहर संघटनेच्या महिलांनी राखी बांधून पोलिस दादांपुढे दारूमुळे होणाऱ्या त्रासाची कहाणी मांडली. दारूविक्री बंद होऊन, सुखाचे जीवन जगण्यासाठी दारू बंद करण्याचे वचन पोलीस दादाला मागितले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तालुका संघटक आनंद इंगळे व स्पार्कची विद्यार्थिनी सोनी सहारे उपस्थित होते.
कुरखेडा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अभय आष्टेकर, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक सुनील सरोदे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक देवराव भांडेकर यांच्या उपस्थितीत रक्षाबंधन सोहळा पार पडला. यावेळी कुरखेडा शहरातील 40 महिला व चिखली, कुंभीटोला, डीप्राटोला, तळेगाव, वडेगाव, जांभूळखेडा व उराडी येथील 20 महिला अशा एकूण 60 मुक्तीपथ संघटनेच्या महिलांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी, सीआरपीएफचे अधिकारी व कर्मचारी बांधवांना राखी बांधून ओवाळणीच्या रूपात शहरातील व गावातील दारू बंद करण्याची मागणी केली. यावेळी पोलिस निरीक्षक आष्टेकर यांनी दारूविक्रेत्यांवर कारवाई करून अवैध दारू विक्री बंद करण्याची ग्वाही दिली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक मयुर राऊत व मुक्तीपथ कार्यकर्त्या कान्होपात्रा राऊत उपस्थित होत्या.
गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव पोलिस मदत केंद्रात मुक्तीपथ तालुका कार्यालय व गाव संघटनांच्या वतीने राखी विथ खाकी या उपक्रमाअंतर्गत रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पीएसआय घोडसे, पीएसआय उरकुडे, पीएसआय बरगे यांच्यासह 60 पोलीस कर्मचाऱ्यांना गाव संघटनेच्या एकूण 14 महिलांनी राखी बांधली. सोबतच गव्हाळहेट्टी, सूर्यडोंगरी, पेकिनकसा, पोटेगाव या गावातील दारू विक्री बंद करण्याची ओवाळणी मागितली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, रेवनाथ मेश्राम, स्विटी आखरे यावेळी उपस्थित होत्या.
एटापल्ली पोलिस स्टेशन येथे पोलिस विभाग व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शहर संघटनेच्या 20 महिलांनी पोलिस बांधवाना राखी बांधून शहरातील अवैध दारूविक्री बंद करण्याची ओवाळणी मागीतली. यावेळी पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, एपीआय मंदार पुरी, पीएसआय ए.के. काळे, अश्विनी नागरगोजे, तालुका संघटक किशोर मल्लेवार उपस्थित होते.
भामरागड पोलीस स्टेशन मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, पीआय किरण रासकर, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडर भोसले, एसआरपीएफ ग्रुपचे पोलिस निरीक्षक साबणे, पीएसआय अभिषेक जंगमवार यांचा उपस्थितीत रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला. यावेळी 7 वॉर्डातील एकूण 19 महिलांनी पोलिस बांधवाना राखी बांधली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तीपथ कार्यकर्ता आबिद शेख व विद्या पुंगाटी यांनी सहकार्य केले. कुरखेडा व पोटेगाव येथे पोलीसबांधवानी बहिणींना साड्या भेट दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here