-आठवडाभरात ७९ रुग्णांवर उपचार
The गडविश्व
गडचिरोली : दारूच्या आहारी गेलेल्या रुग्णांना उपचाराची सोय उपलब्ध व्हावी यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे तालुका मुख्यालयी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. गेल्या आठवडाभरात एकूण ७९ रुग्णांनी उपचार घेतला असून जिल्ह्यातील इच्छुक रुग्णांना वेळेवर उपचार घेणे सोयीस्कर ठरत आहे.
मुक्तीपथ अभियानातर्फे बाराही तालुक्यात नियोजित दिवशी क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेक रुग्ण उपचारातून बरे झाले आहेत. क्लिनिकला भेट दिलेल्या रुग्णांना समुपदेशन सुद्धा करण्यात आले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना देण्यात आली. यामुळे व्यसनातून मुक्त होण्यासाठी रुग्णांना मदत होणार आहे.
सोमवारी गडचिरोली ७, बुधवार देसाईगंज १७, गुरुवारी एटापल्ली ७ व मुलचेरा ९, शुक्रवारी अहेरी १२, चामोर्शी १७ तर सिरोंचा तालुक्यातील १० रुग्ण अशा एकूण ७९ रुग्णांनी तालुका क्लिनिकच्या माध्यमातून उपचार घेतला आहे. तसेच उपचार घेतलेल्या रुग्णांच्या घरोघरी जाऊन नियमित पाठपुरावा करून त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील रुग्णांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.