The गडविश्व
चंद्रपूर, १७ ऑक्टोबर : जिल्हयातील नागरिकांचे आधार दास्तवेज अद्यावत करणे तसेच आधार बाबत अडचणी बाबत मार्गदर्शन करण्याकरिता तहसिल कार्यालय चंद्रपूर येथे आधार प्रशिक्षण संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम होते तर जिल्हा समन्वयक महाआयटी चंद्रपूर लालसरे तसेच संगणक तज्ञ मंगेश कुरेकर, सर्व डीआयटी, महाआयटी अंतर्गत सुरू असलेल्या आधार नोंदणी चालक विनोद खंडारे, व ऑपरेटर उपस्थित होते.
यावेळी ओळखीचे प्रमाणपत्र, पत्ता व इतर संबंधित कागदपत्रे अपडेट करण्याबाबत सांगण्यात आले. आधार कार्डमधील चुकांकडे दुर्लक्ष न करता वेळीच महत्त्वाची कागदपत्रे देऊन ते अपडेट करून घेणेही तितकेच गरजेचे आहे, कुठल्याही व्यक्तीला त्याच्या आयुष्यात केवळ एकदाच आधार नंबर दिला जातो. यूआयडीएआयच्या वतीने हा नंबर देण्यात येतो. आधार कार्डमध्ये १२ अंकांचा एक विशिष्ट क्रमांक असतो यामुळे संबंधित नागरिकाची माहिती मिळते यात पत्ता, आई-वडिलांचे नाव, वय यासह इतर माहिती उपलब्ध असते. विशेष म्हणजे एखाद्या ठिकाणी आधार कार्ड देण्याची आवश्यकता असल्यास मास्क्ड आधार कार्डचा वापर करू शकता, असेही यादरम्यान मार्गदर्शन करतांना सांगितले.
भारतात जन्माला आलेल्या बाळापासून अगदी वयोवृद्ध असलेल्या नागरिकाचंसुद्धा आधार कार्ड तयार करावे लागते. जन्मलेल्या मुलाचा आधार क्रमांक त्यांच्या पालकांशी जोडला गेलेला असतो. बाळ जेव्हा ५ वर्षांपेक्षा मोठे होते तेव्हा त्याच्या बोटाचे ठसे घेतले जातात आणि त्याला स्वतंत्र ओळख प्राप्त होते. आधार कार्डमधील चुकांकडे दुर्लक्ष न करता वेळीच महत्त्वाची कागदपत्रे देऊन ते अपडेट करून घेणेही तितकचे गरजेचे आहे.
