– अडीच हजारांची लाच रकम स्वीकारतांना अटक
The गडविश्व
भंडारा, २२ जुलै : विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (TC) देण्यासाठी पालकाकडून तीन हजार रुपयांची लाच रकमेची मागणी करून अडीच हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारतांना मुख्याध्यापक, शिक्षक आणि लिपिकास भंडारा(Bhandara) लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने गुरुवार २१ जुलै रोजी रंगेहात पकडले.
मुख्याध्यापक खेमराज मुरलीधर वासनिक (५१), सहायक शिक्षक राजेश छत्रपती गजभिये (४४) व लिपिक सतीश श्यामलाल बिसेन (४८) अशी लाचखोरांची नावे आहेत. सदर कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तुमसर (Tumssr) तालुक्यातील सिहोरा येथे महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे. येथील सातव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकाला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याध्यापक वासनिक आणि लिपिक बिसेन यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. व ताडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र पालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. दरम्यान गुरुवार २१ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास सहाय्यक शिक्षक राजेश गजभिये यांना अडीच हजार रुपये स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मुख्याध्यापक व लिपिक यांच्या सांगण्यावर ही लाच स्वीकारल्याचे पुढे आले. या प्रकरणी तिघांनाही ताब्यात घेऊन सिहोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.