झाडीपट्टी नाट्य महोत्सवामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध

428

-प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद
– अमृत भारत वर्षात अभिनव उपक्रम
The गडविश्व
गोंदिया : झाडीपट्टी नाट्य ही पूर्व विदर्भातील समृद्ध अशी प्रयोगात्मक कला असून जनसामान्य नागरिकात या कलेविषयी मोठ्या प्रमाणात आत्मियता आहे. या कलेच्याद्वारे मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी तसेच स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अमृत भारत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या कल्पनेतून अनेक अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याच अभिनव उपक्रमाचा भाग म्हणून झाडीपट्टी नाट्य कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या दृष्टीने स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रेक्षकांना या नाटकाचा निःशुल्क आस्वाद घेता यावे यासाठी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला व छत्तीसगढ राज्याला लागून असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे चार दिवसीय झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे निःशुल्क आयोजन सांस्कृतीक विभागाकडून करण्यात आले आहे. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
झाडीपट्टी नाटकांसाठी प्रसिद्ध असलेले लेखक व दिग्दर्शक गायक अनिरुद्ध वनकर यांचे “घायाळ पाखरा” या नाटकाने शासनाच्या झाडीपट्टी नाटय महोत्सवाला सुरवात झाली “घायाळ पाखरा” या शासनाच्या झाडीपट्टी नाटकाने प्रेक्षकांना अक्षरशः “घायाळ” केले. सत्य घटनेवर आधारित या नाटकाने प्रेक्षाकांच्या प्रतिसादाचा उच्चांक गाठला. गुरुवार 24 फेब्रुवारी 2022 रोजी “लोक काय म्हणतील” हे अमर कुमार मसराम लिखित आणि सुनील अष्टेकर दिग्दर्शित नाटकाने प्रेक्षक भारावून गेला. शुक्रवार दिनांक 25 फेब्रुवारी,2022 रोजी यश निकोडे लिखित व प्राध्यापक शेखर डोंगरे दिग्दर्शित “टाकलेले पोर” या नाटकाने गर्दीचा एक उच्चांक गाठला असल्याचे दिसून आले.
शनिवार 26 फेब्रुवारी 2022 रोजी शिल्पा पाटील लिखित आणि शेखर पटले दिग्दर्शित शेवटचे नाटक “लाखात एक लाडाची” लेक“ हे नाटक सादर होणार असून सांस्कृतीक विभागातर्फे या वर्षीच्या झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे हे शेवटचे नाटक असणार आहे. संपूर्ण झाडीपट्टी नाट्य महोत्सव रसिकांसाठी विनामुल्य असून त्याचा लाभ सर्व प्रेक्षक रसिकांनी घ्यावा, असे आवाहन विभिषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य, मुंबई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here