जागतिक सायकल दिन विशेष : तीस वर्षात पेट्रोल-डिझेल चा एक थेंबही न वापरणारा पर्यावरणदूत “गुरुदेव बाळेकरमकर”

798

पर्यावरणाचे संवर्धन हा खूपच महत्त्वाचा विषय आहे. सध्या आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहोत आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळेच ही परिस्थिती आज माणसांवर आली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आधी प्रत्येक घरात दुचाकी अथवा इतर वाहने नसत मोठ्या प्रमाणात लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना दिसत . मात्र आजची परिस्थिती अत्यंत किचकट झाली असून आज प्रत्येक घरात किमान एक आणि सरासरी दोन वाहने नक्कीच असतात. त्यामुळे लागणाऱ्या इंधनाची मागणी देखील वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून होणाऱ्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर पडलेला आहे. पण अशाही परिस्थितीत आजच्या काळात अशी काही लोक आहेत जी पर्यावरणाचे संवर्धन करत आहेत. असंच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे गुरुदेव बाळेकरमकर. गेल्या तीस वर्षांत पेट्रोल-डिझेलचा एक थेंब सुद्धा विकत न घेणारे. गुरुदेव बाळेकरमकर सध्या गडचिरोली येथील नगर परिषद कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी पेट्रोल-डिझेलचा एक थेंब विकत घेतला नाही व वापरला नाही. त्याऐवजी ते पर्यावरण पूरक साधन सायकलचा वापर करतात. १९९२ साली त्यांनी पहिली सायकल घेतली. तेव्हापासून ते नियमित घरापासून ते कार्यालयापर्यंत २ किमी अंतर सायकलने प्रवास करतात. स्वतःची छोटी-मोठी कामेही ते सायकलनेच करतात. दूरच्या प्रवासात करिता सार्वजनिक वाहन व्यवस्था उदा. रेल्वे , बस यांचा वापर करतात. इतकेच काय तर त्यांच्या या कार्यात त्यांच्या कुटुंबांचे ही सहकार्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पत्नी व मुलेही जमेल तिथे पायदळ, सायकल व सार्वजनिक वाहनांचा वापर करत आले आहेत. आजच्या काळात ही या कुटुंबात कुणीच पेट्रोल-डिझेल इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा वापर करत नाहीत. गडचिरोली शहरातील रहिवासी याचा पुरावा आहेत. त्यांनी गेली अनेक वर्षे या कुटुंबाला पर्यावरणपूरक साधनांचा वापर करतांना बघितले आहे. गुरुदेव बाळेकरमकर म्हणतात, ” इंधनाचा साठा हा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तसेच तेल उत्पादक कंपन्यांनीही तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाला मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा जाणावणार आहे. तसेच दिवसेंदिवस इंधनांच्या किमतीतही वाढ होत आहे. त्यामुळे इंधन बचत व संवर्धनासाठी जागृत होणे आवश्यक आहे.”
भविष्यात ते इलेक्ट्रिक वर चालणारे वाहन घेणार असून नजीकच्या स्थळावर व शहरातील प्रवासातकरिता या वाहनाचा वापर करतील. गेल्या तीस वर्षांपासून पेट्रोल डिझेल चा एक थेंब सुद्धा विकत न घेता पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या प्रयत्नाने त्यांनी त्यांची जबाबदारी ओळखली आहे.

  • स्वाधीनता बाळेकरमकर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here