चिमूर तालुक्यातही आढळले आकाशातून पडलेले अवशेष

1126

The गडविश्व
चिमूर : शनिवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात आकाशातून लाल रंगाची वस्तु जमिनीवर पडताना दिसली. जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात गोलाकार रिंग आणि लोखंडी गोळे आढळले तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले हे अवशेष संबंधित पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले आहे. आता चिमूर तालुक्यातही हे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे.
तालुक्यातील खडसंगी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या तळोधी बीटातील कक्ष क्रमांक ४५ मधील वन तलावाजवळ वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालीत असतांना तलावात विचित्र वस्तू दिसून आल्याने बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यात सध्या आकाशातून पडलेल्या अवशेषांची चर्चा असल्याने ते वस्तू हि त्याचाच भाग असल्याचे लक्षात आले. दरम्यान त्यांनी हि माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांना देऊन सदर अवशेष त्यांच्याकडे सोपविली आहे. सध्या हे अवशेष चिमूर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून अंतराळ विभागातील शास्त्रज्ञ आल्यानंतर त्यांच्याकडे हे अवशेष सोपविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात गोलाकार रिंग आणि लोखंडी गोळे आढळले असले तरी या घटनेबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले हे अवशेष संबंधित पोलिस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये. इतर ठिकाणी अशा आणखी वस्तु आढळल्यास नागरिकांनी सदर वस्तुला स्पर्श करू नये तसेच सेल्फी घेण्याचे टाळावे. याबाबत तात्काळ जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here