THE गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील कोंढेसरी या प्राचीन मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ जणांच्या टोळीतील 6 जणांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. दोन आरोपी फरार झाले आहे. सहाही आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अन्य दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. नागरी गावातील काही शेतकऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून आरोपींचा हा डाव उधळून लावला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील नागरी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर प्राचीन कोंढेसरी मंदिर आहे. मंदिर परिसरात मागील तीन महिन्यांपासून काही संशयास्पद हालचाली सुरू होत्या. या मंदिरात काही अनोळखी लोकांचे यणे जाणे सुरू आहे. गुप्तधन शोधण्याच्या उद्देशाने ते मंदिराच्या आतील आणि बाहेरील परिसराची पाहणी करत असल्याचा संशय शेतकऱ्यांना आला होता. तसेच 8 दिवसांपूर्वी संबंधित मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे स्थानिक नागरिक सतर्क झाले होते. तसेच गुरुवार, शनिवार, पौर्णिमा किंवा अमावस्या अशा मुहूर्तावर खोदकाम होण्याचा संशय नागरिकांना होता.
त्यामुळे गावातील काही शेतकऱ्यांनी मंदिर परिसरात पाळत ठेवली होती. दरम्यान शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास मांत्रिकासह आठ जणांची टोळी मंदिर परिसरात चारचाकी गाडीने आली. त्यांनी मंदिराच्या आतमध्ये आणि बाहेर आसपास पाहाणी केली. त्यानंतर त्यांनी मंदिरात शिरून पूजापाठ करायला सुरुवात केली. त्यानंतर गुप्तधन शोधण्यासाठी त्यांनी मंदिरात खोदकाम करायला सुरुवात केली. यावेळी पाळत ठेवलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना हटकले. पण आरोपींची संख्या जास्त असल्याने त्यांनी संबंधित शेतकऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. पण यातील एका पण यातील एका शेतकऱ्याने आधीच गावातील काही जणांना या घटनेची माहिती दिली.
त्यामुळे थोड्याच वेळात गावातील अनेक लोक मंदिर परिसरात जमा झाले. त्यांनी तब्बल दीड किलोमीटर पाठलाग करून आरोपींना पकडले. यातील दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. सहाही आरोपींना पकडून गावकऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या हवाली केले आहे.