The गडविश्व
गडचिरोली : पालकमंत्री तथा नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज १ मार्च रोजी गडचिरोली येथे एकल केंद्र गौण वनोपज आधारित प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच काही सूचना त्यांनी यावेळी उपस्थित संबंधित अधिकारी वर्गांना दिल्या. प्रकल्पाची संकल्पना ही गौण वनोपज आधारित प्रकल्प ह्याचे उद्देश वनसंवर्धन आणि व्यवस्थापनातून शाश्वत दृष्टीकोन ठेवून दुर्बल लोकांसाठी उपजीविका निर्माण करण्यासाठी संभाव्य गौण वनोपजांचा संग्रह, साठवण, प्रक्रिया, पॅकेजिंग, व्यापार, प्रतवारी, गौण वनोपजांच्या वस्तूंचे वर्गीकरण यासाठी स्वयं-शाश्वत केंद्रे विकसित करणे हा आहे. ही केंद्रे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजसह सक्षम केली जातील. सदर केंद्रांना क्रेडिट लिंकेज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. यावेळी पोलीस उप महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगरू डॉ.प्रशांत बोकारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.
प्रकल्पाची उद्दिष्टे ही गौण वनोपजांच्या संदर्भात ग्रामसभांना प्रशिक्षित करणे आणि त्यांची क्षमता वाढविणे, गौण वनउत्पादनाच्या संदर्भात व्यावसायिक क्रियाकलाप सुलभ करणे, गौण वनउत्पादनाच्या संदर्भात व्यावसायिक क्रियाकलापांना समर्थन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करणे, ग्रामसभा, स्वयंसहाय्यता गट आणि इतर भागधारकांना गौण वनउत्पादनाच्या संदर्भात व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सहभागी करुन घेणे अशी आहेत. एकल सेंटरचे 6 संभाव्य ठिकाणे गडचिरोली, धानोरा, कोरची, वडसा, एटापल्ली, भामरागड याप्रमाणे आहेत. यापैकी गडचिरोली येथील एकल सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या एकल सेंटरमध्ये प्रशासकीय सुविधा, प्रशिक्षणे, बँकिंग, गोडाऊन ही सुविधा देण्यात येणार आहेत. एक ‘एकल सेंटर’ उभारणीला अंदाजित खर्च रुपये 1 कोटी पर्यंतचा आहे.