गोवंश तस्कराच्या आवळल्या मुसक्या : ३० गोवंशांना जीवनदान

480

-ट्रकसह २३ लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

The गडविश्व
ता.प्र / सावली, ८ जुलै : अवैधरित्या गोवंशांची वाहतूक करणाऱ्या गोवंश तस्कराच्या सावली पोलिसांनी मुसक्या आवळत ट्रकसह २३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गुरुवार ७ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली मूल मार्गावरील चकपिरंजी ते सावली दरम्यान नाकाबंदी करून करण्यात आली.
दरम्यान ट्रकमध्ये असलेल्या ३० गोवंशांना जीवनदान देण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी शेख इरफान शेख मलग (२५) रा. केरामेरी जि.आसीफाबाद तेलंगणा याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली-मुल मार्गावरून अवैध गोवंश जनावरांची वाहतूक होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली असता सकाळच्या सुमारास चकपिरंजी ते सावली दरम्यान नाकाबंदी करून गडचिरोली मार्गे येणाऱ्या संशयित एमएच २९ एएन ५७८६ क्रमांकाच्या ट्रकला थांबवून झडती घेतली असता ट्रकमध्ये लहान मोठे असे एकूण ३० गोवंश जनावरे वाहनाची क्षमता नसतांना अत्यंत निर्दयीपणे, क्रूरतेने कोंबून ठेवल्याचे दिसून आले. यावेळी सदर गोवंश जनावरे एकूण किंमत ३ लाख रुपये, व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक किंमत २० लाख रुपये, एक मोबाईल किंमत अंदाजे १० हजार रुपये असा एकूण २३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जप्त केलेले गोवंश यांना त्यांच्या सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने गोशाळेत दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा कलम ५(अ), प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११डी,एफ, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९, मोटारवाहन अधिनियम कलम ८३/१७७ अन्वये पोलीस स्टेशन सावली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक शेखर देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा दर्शन लाटकर, दिलीप मोहूर्ले, पोका धीरज पिटुरकर, दीपक चव्हाण यांनी केली. सदर कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here