गोंडवाना विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ : विद्यार्थ्यांना दिलासा

433

– शैक्षणिक सत्र २०२२ – २३ करीता विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबर पर्यंत प्रवेश घेता येणार
The गडविश्व
गडचिरोली (Gadchiroli) १६ सप्टेंबर : गोंडवाना विद्यापीठाच्या (Gondwana University) शैक्षणिक सत्र २०२२ – २३ करिता १५ सप्टेंबर २०२२ ही प्रवेश घेण्याची अंतीम तारीख होती मात्र आता विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना दिलासा दिला असून  ३० सप्टेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता जे विद्यार्थी प्रवेश घेण्यापासून वंचित होते त्यांना प्रवेश घेणे सोयीस्कर होणार आहे. विद्यापीठाने याबाबतचे पत्र विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
२९ ऑगस्ट २०२२ नुसार विद्यापीठाचे पदव्युत्तर शैक्षणिक विभाग व संलग्नित महाविद्यालयात सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची अंतीम दिनांक १५ सप्टेंबर २०२२ होती. परंतू काही विद्यार्थी या तारखेपर्यन्त महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकले नाही तसेच विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी सर्व प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक वेळापत्रकातील क्र. २ (b) च्या अधीन राहून मा. कुलगुरूंच्या परवानगीने ३० सप्टेंबर २०२२ पर्यंन्त महाविद्यालयात प्रवेश घेण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर मुदतवाढ ज्या अभ्यासक्रमाचे प्रवेश केंन्द्रीय प्रवेश समितीद्वारे केले जातात त्यांना लागू राहणार नाही. तसेच निर्धारित प्रवेश क्षमतेमध्ये रिक्त जागी प्रवेश देण्यासाठी हि मुदतवाढ देण्यात येत आहे असे कुलगुरू यांच्या आदेशाने कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here