गावातील दारुविक्री तत्काळ बंद करा : विविध तालुक्यातील तहसीलदारांचे पत्र

346

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी आहे. त्यानुसार ग्रा.प. अंतर्गत येणा-या गावात दारु विक्री सुरु असल्यास सरपंच, पोलीस पाटील, पेसा (मादकद्रव्य नियंत्रण समिती) अध्यक्ष यांनी संयुक्त कृती करून अवैध दारू विक्री बंद करावी, असे पत्र अहेरी, वडसा, भामरागड, धानोरा, गडचिरोली, सिरोंचा या तालुक्यातील तहसीलदारांनी निर्गमित केले आहे.
पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र ग्राम पोलीस कायदा कलम ६ व ८ अंतर्गत गावाच्या हद्दीतील अवैध दारू विक्रेत्याचा शोध घेऊन दारुविक्री बंद करणे, याबाबत ठाणेदारांना माहिती देणे ही सरपंचाची व पोलीस पाटलाची जबाबदारी आहे. मुंबई दारुबंदी कायदा १९४९ कलम १४३ नुसार गावात दारु विक्री होणार नाही, विक्री होत असल्यास संबंधित पोलीस अधिका-यास माहिती देऊन विक्री बंद करणे गरजेचे आहे. मुक्तिपथ प्रकल्पा अंतर्गत जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार, स्थापित मुक्तिपथ ग्रा.प. समिती आणि गावातील मुक्तिपथ गावसंघटनेचे सहकार्य मिळवून किंवा गरज पडल्यास पोलिसांच्या मदतीने आवश्यक कार्यवाही करून पुढील ३० दिवसात गावातील अवैध दारु विक्री सुरु असल्यास बंद करावी. गावातील गाव पाटील, पेसा अध्यक्ष व सरपंच यांनी संयुक्त कारवाई करावी. तसा अहवाल तहसिल कार्यालयास सादर करावा. गावातील अवैध दारुविक्री बंद झाल्याची खातरजमा केली जाईल, असेही पत्रात नमूद केले आहे. मुक्तिपथ तालुका समितीचे अध्यक्ष तथा तालुका दंडाधिकारी म्हणून तहसीलदारांच्या पाठवलेल्या या पत्रामुळे गावा-गावातील अवैध दारूविक्री बंद होण्यास तसेच कारवाई होण्यास नक्कीच मदत होणार आहे, गावातील दारूबंदी गावसंघटना यांना यामुळे बळ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here