गावागावात पाणी बचतीबाबत लोक चळवळ उभी राहणे आवश्यक : अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील

277

– १६ ते २२ मार्च दरम्यान जिल्ह्यात होणार जलजागृती सप्ताहाचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली : पाण्याविषयी सर्वांनाच माहिती आहे मात्र पाणी बचतीचे मार्ग, पाणी साठवणूक, पाणी वापर, पाणी गुणवत्ता इत्यादीबाबत सर्वसामान्य लोकांच्यामध्ये लोकचळवळ उभी राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धनाजी पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी केले. गडचिरोली सारख्या पाणी संपन्न जिल्ह्यात जास्त पाऊस असतो. तर उन्हाळ्यात ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी पाणी टंचाई सुद्धा भासते. याचे प्रमुख कारण लोकांच्यात पाणी साठवणूक व पाणी जिरवणे याबाबत उदासिनता दिसून येते. राज्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती दरवर्षीच येते. भविष्यात गडचिरोलीत पाणी टंचाई भासू नये म्हणून आतापासूनच पाण्याबाबत नियोजन करणे आवश्यक असून यासाठी गावागावात लोकांचा लोकसहभाग उभा करून एक लोकचळवळ उभी झाली तर पाणीटंचाईचा भविष्यातील प्रश्न सुटू शकेल व पर्यावरण चक्र अबाधित राहील असे ते पुढे म्हणाले. जिल्हा प्रशासनाकडून जलसंपदा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पाटबंधारे विभागामार्फत 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध विभागांचा सहभाग असून 22 मार्च रोजी जलदीनादिवशी या सप्ताहाची सांगता होणार आहे. जल सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यकारी अभियंता पाटबंधारे अविनाश मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, कोषागार अधिकारी मनोज कंगाली, प्रमुख वक्ते अनुप कोहळे, जलप्रेमी मनोहर हेपट, उपविभागीय अभियंता गणेश परदेशी, सहाय्यक कार्यकारी अभियंता सारिका पानतावणे, उपविभागीय अभियंता जलसंधारण अधिकारी पी एम इंगोले, उप विभागीय अभियंता न.सु.मेश्राम, सहाय्यक अभियंता अमित डोंगरे, उपविभागीय अभियंता संतोष वाकोडे उपस्थित होते.
जल जागृती सप्ताहानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे जल एकत्रित करून जलसागर कुंडामध्ये पाणी एकत्रित करून जलपूजा करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपस्थितांना जल प्रतिज्ञाही देण्यात आली. कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी बोलताना कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम यांनी जल दिनाचे महत्त्व सांगून पाणी बचतीचे व पाणी वापराचे मार्ग उपस्थितांना सांगितले. ते म्हणाले पृथ्वीतलावर उपलब्ध सर्वच पाणी पिण्यायोग्य नसून त्यातील काही भागच पिण्यायोग्य आहे. त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागात पाणी बचतीचे उपाय लोकांना माहीत असणे आवश्यक असून घरापासून ते अगदी औद्योगिक क्षेत्रात, शेती क्षेत्रात पाण्याचा वापर काटकसरीने होणे अपेक्षित आहे. प्रशासन वेळोवेळी याबाबत कार्यक्रम राबवित असून यामध्ये लोकांचा सहभाग घेऊन योग्य उपाययोजना राबविल्या तर वेळेतच पाणीटंचाई दूर करून पाण्याचे योग्य नियोजन साधता येईल असे ते पुढे म्हणाले.
जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी यावेळी घराच्या उंबऱ्यापासून ते शेतीच्या बांधापर्यंत पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे असून प्रत्येक ठिकाणी पाण्याचे अंदाजपत्रक तयार करणे गरजेचे असल्याचे नमूद केले. ते पुढे म्हणाले पाणी बचतीबाबत आता लोकांना सांगण्याची गरज नाही प्रत्यक्षात त्यांच्या कडून कृती करून घेणे आवश्यक आहे. गाव स्तरावरील लोकचळवळीमधून पाण्याची बचत व वापर सुयोग्यरीत्या आपण राबवू शकतो.
यावेळी जलदिनाचे महत्त्व व पाणी टंचाईचे प्रश्न सोडवण्यासाठीचे मार्गदर्शन उपस्थित वक्ते मनोहर हेपट व अनुप कोहळे यांनी केले. जलजागृती सप्ताहामध्ये जिल्ह्यातील विविध विभाग यामध्ये जलसंपदा विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, नगर विकास विभाग, पर्यावरण विभाग, उद्योग विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रामविकास व जलसंधारण विभाग तसेच जिल्हा माहिती कार्यालय विविध उपक्रमातून जलजागृती बाबत कार्यक्रम राबवणार आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना उपविभागीय अभियंता गणेश परदेशी यांनी केली तर आभार सारीका पानतावणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here