– विविध ठिकाणी निर्णयांची अंमलबजावणी
The गडविश्व
गडचिरोली : गावाला दारू व तंबाखू विक्री मुक्त करण्याहेतू आतापर्यंत जिल्हाभरात २४३ मुक्तिपथ ग्रामपंचायत समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावातील शांतता भंग होते. भांडण तंटे होतात, युवापिढी व्यसनाच्या मार्गाकडे वळते. दारूच्या या दुष्परिणामांमुळे गावांचा विकास पूर्णतः खुंटतो ही बाब लक्षात घेता. ८ डिसेंबर २०२१ ला झालेल्या जिल्हा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशातून व मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून व प्रशासनाच्या सहकार्याने ग्रामपंचायत स्तरावर विशेष समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समितीमधील पदाधिकाऱ्यांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रापं सदस्य, पोलिस पाटील आदींचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ४५७ पैकी २४३ ग्रामपंचायत स्तरावर या समित्यांच्या बैठका पार पडल्या असून समित्या पुनर्गठीत करण्यात आल्या. गावातून दारू व तंबाखू हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथ कार्यकर्ते ग्रा.प. पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत. सोबतच गावातील अवैध दारूविक्री बंद करणे, सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर कारवाई, दंड करणे, विक्रेत्यास शासकीय योजनांपासून वंचित ठेवणे, गावात पिऊन येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, वारंवार सूचना करूनही अवैध व्यवसाय सुरूच ठेवणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत. काही गावांनी निर्णयांची अंमलबजावणी सुद्धा सुरु केली आहे. यासाठी गावकरी सुद्धा सहकार्य करीत आहेत.
एटापल्ली तालुक्यातील दुर्गम अशा सोहगाव ग्रामपंचायत अंतर्गत भापडा गावाने घरगुती दारू काढणे व विक्री बंद केली आहे. सिनभट्टी, पडोली या गावाने खर्रा विक्री बंद केली आहे. तोडसा ग्रा.पं. अंतर्गत पेठा गावाने विदेशी दारू विक्री बंद केली. बटेरा, मगदण्डी, गड्डापल्ली या गावाने दारू व खर्रा विक्री बंद केली आहे. भामरागड तालुक्यातील होडरी येथे घरगुती दारूचे प्रमाण कमी करण्यासाठी कृती करण्यात आली. धोडराज येथील खर्रा विक्रेत्यांना नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला. देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, कुकडी व विसोरा ग्रामपंचायत समितीने गावातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस विभागास निवेदन दिले. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव, ठाणेगाव, कुकडी व मोहगावातील समितीने अहिंसक कृती केली. चामोर्शी तालुक्यातील रामाळा, दोटकुली, घारगाव, वाघोली, नवरगाव, तळोधी, आमगाव, मकेपल्ली, नागपूर चक, वेलतूर तुकूम येथील ग्रापं समितीने अवैध दारूविक्रेत्यांविरोधात कृती केली. गडचिरोली तालुक्यातील पोर्ला ग्रापं समितीने मुद्देमालासह दोन विक्रेत्यास पोलिसांच्या स्वाधीन केले. इतरही तालुक्यातील विविध ग्रापं समित्यांनी निर्णयाची अंमलबजावणी करीत व्यसनमुक्त गावे निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यातील एकूण २४३ ग्रामपंचायत समित्यांची बैठक पार पडली. यात सर्वाधिक गडचिरोली तालुक्यातील ४१, देसाईगंज १७, आरमोरी २१, कुरखेडा २६, कोरची १२, धानोरा २४, चामोर्शी २१, मुलचेरा ९, एटापल्ली २८, भामरागड ५, अहेरी २१ व सिरोंचा तालुक्यातील १८ ग्रामपंचायत स्तरावर समित्या गठीत करून पुढील वाटचाल सुरु आहे.
