गडचिरोली : १७ टक्के आरक्षणाने जिल्ह्यातील ओबीसींच्या नोकर भरतीचा मार्ग मोकळा

287

THE गडविश्व
गडचिरोली : अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये गट-क व गट-ड संवर्गातील सर्व सेवेच्या भरतीसाठी ओबीसींचे सुधारित आरक्षण निश्चित करण्याचा निर्णय 15 सप्टेंबर 2021 च्या मंत्रिमंडळात घेण्यात आला व लगेच 23 सप्टेंबर 2021 रोजी याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला परंतु सुधारित आरक्षणाची बिंदुनामावली जाहीर करण्यात आली नव्हती त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून गडचिरोली जिल्ह्यातील सुधारित आरक्षणा प्रमाणे वर्ग 3 व 4 च्या नोकर भरती रखडल्या होत्या. सुधारित बिंदुनामावली लवकरात लवकर जाहीर करण्यात यावी म्हणून गेल्या तीन महिन्यापासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसी मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे तगादा लावला होता. या प्रयत्नांना यश आले असून गडचिरोली जिल्ह्यात 17 टक्के आरक्षणाने ओबीसी नोकरभरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
3 जानेवारी 2022 रोजी सुधारित बिंदुनामावली चा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. सदर बिंदुनामावली, शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून म्हणजे 23 सप्टेंबर 2021 पासून अनुसूचित जमातींची लोकसंख्या जास्त असलेल्या नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड मधील पदे सरळसेवेने भरती करण्यासाठी या सुधारित बिंदूनामावली चा अवलंब करण्याची सूचना सामान्य प्रशासन विभागाने केली आहे.
18 जून 1994, सप्टेंबर 1997 व ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार वरील आठ जिल्ह्यामधील आरक्षण 19 टक्क्यावरून कमी करण्यात आले होते.सदर 8 जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत व्हावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ व इतर समविचारी संघटनांनी यासाठी दीर्घकालीन लढा दिला होता. आज या लढ्याला यश आले असून महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे ,समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर , गडचिरोली जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, कार्याध्यक्ष विनायक बाणदूरकर,उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, सचिव प्रा.देवानंद कामडी, कोषाध्यक्ष डॉ.सुरेश लडके, महिला संघटक सुधा चौधरी, शहर महिला अध्यक्ष सोनाली, पुण्यवार, जिल्हा युवा अध्यक्ष राहुल मुनघाटे, प्रभाकर वासेकर,शालीग्राम विधाते तसेच सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, ओबीसी मंत्री ना. विजय वडेट्टीवार, ना.छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांचे व राज्य सरकारचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here