गडचिरोली : रानटी हत्तींचा कोरची तालुक्यात धुमाकूळ, चालत्या दुचाकीस्वारास खाली पाडले

846

– बेडगाव घाटाजवळील घटना
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा , २६ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्यात जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश करत देसाईगंज, कुरखेडानंतर पुन्हा कोरची तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. कोरची तालुक्यात हत्तींच्या कळपातील एका हत्तीने चालत्या दुचाकीस्वारांना खाली पाडल्याची घटना समोर येत असून प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारांनी कसाबसा आपला जीव वाचवला यात ते किरकोळ जखमी झाले. मात्र दुचाकीस्वारांना काही काळ जंगलात अंधारात काढावी लागली.
व्यापारी दामोधर कुंभारे (५७), विनायक कुंभारे (२७) रा.कोरची व महेश बिजलेकर (३०) रा. बोरी हे दुचाकीने कोरचीला जात होते. सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान बेडगाव घाट ओलांडून झनकारगोंदी गावाजवळील रस्त्यावर एकाएकी जंगली हत्तींचा कळप समोर आला. हत्तींच्या कडेने आपण पुढे निघून जाऊ हा बेत आखून दुचाकीवरील तिघेही गाडी न थांबवता पुढे जाऊ लागले. मात्र यावेळी कळपातील एका हत्तीने आपल्या सोंडेने दुचाकीवरील सर्वात मागे बसलेल्या युवकाला ढकलले. यावेळी दुचाकीचे नियंत्रण बिघडल्याने रस्त्यालगतच्या खड्ड्यात जाऊन पडले. दरम्यान त्यांनी कसेबसे स्वतःला सावरत हत्तींपासून जीव वाचवण्यासाठी जंगलाच्या दिशेने पळ काढला. मात्र या गडबडीत ते जंगलात भटकले. अंधार पडल्याने त्यांना मार्ग काढणे कठीण झाले होते. काही काळानंतर मुख्य रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या लाईट्स प्रकाश त्यांना दिसला व अंदाज काढत मुख्य रस्ता सापडला. यावेळी त्यांनी वाहनांना हात दाखवून थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही थांबायला तयार नाही. काही वेळाने कुरखेडाकडे जाणाऱ्या कोरचीमधील एक ओळखीच्या व्यापाराने त्यांची मदत केली.
या घटनेत दामोदर यांच्या पाठीला, विनायकला डाव्या बाजूच्या हाताला व महेशला अंतर्गत मुकामार लागला आहे. कोरची येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेत घरी सुखरूप पोहचले. मात्र जंगली हत्तींच्या धुमाकुळामुळे आद्यपही दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here