गडचिरोली : पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “ऑपरेशन रोशनी” अंतर्गत ४७ जणांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

137

– गडचिरोली पोलीस व जिल्हा सामान्य रुग्णालय यांचा संयुक्त उपक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १२ नोव्हेंबर : गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी” च्या माध्यमातुन गडचिरोली जिल्हयातील अतिदुर्गम व दुर्गम भागातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध नाविण्यपुर्ण उपक्रम सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणुन दृष्टीदोष असलेल्या रुग्णांच्या जीवनातील अंधकार दुर करुन त्यांना नवी दृष्टी प्राप्त करुन देण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने “ऑपरेशन रोशनी” हा उपक्रम जिल्ह्रातील प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय स्तरावर एकुण ११ ठिकाणी नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्याचे निश्चित केलेले आहे.
या उपक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील धानोरा, कारवाफा, गडचिरोली (घोट), सिरोंचा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात नेत्र तपासणी शिबीर पार पडले आहे. यामध्ये ८४० हून अधीक नागरिकांनी सहभाग घेतला यापैकी ३०२ रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, असे निदर्शनास आले. यापैकी धानोरा येथिल ४ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या शिबिरातील एकुण ४७ नागरीकांचे मोतिबिंदू शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे ११ नोव्हेंबर २०२२ रोजी यशस्वीरित्या पार पडली. आज गडचिरोली पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांशी संवाद साधला आणि ऑपरेशन रोशनी उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील इतर नागरिकांनी घ्यावा व यामध्ये उपविभाग कुरखेडा १५ नोव्हेंबर, पोस्टे कोरची १७ नोव्हेंबर, उपविभाग भामरागड १८ नोव्हेंबर, उपविभाग जिमलगट्टा २२ नोव्हेंबर, उपविभाग हेडरी २१ नोव्हेंबर, उपविभाग एटापल्ली २३ नोव्हेंबर व प्राणहिता (अहेरी) २९ नोव्हेंबर २०२२ पोलीस दलामार्फत अभियान रोशनीचा पुढील कार्यक्रम जाहीर केला आहे. तसेच मोफत उपचार झाल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व रुग्णांनी गडचिरोली पोलीस दलाच्या उपक्रमाचे कौतुक करुन गडचिरोली पोलीस दल व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा, मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा., गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, सोबत अतिरीक्त शल्य चिकीत्सक डॉ. सतिशकुमार सोळंके, नेत्र चिकित्सक डॉ. आर. व्ही. चांदेकर, नेत्र सर्जन डॉ. सुमित मंथनकर, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. राजेश बत्तुलवार, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. नानाजी मेश्राम हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा तसेच गडचिरोली जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तालुका वैद्यकिय अधिकारी व नेत्र चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय टीम, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी, नाकृशा प्रभारी अधिकारी महादेव शेलार, पोउपनि. धनंजय पाटील व ना.कृ. शाखेतील सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here