गडचिरोली : पर्यायी व्यवस्था होणार, फुटपाथ धारकांच्या आंदोलनाला यश

353

– आठवडाभरात पर्यायी जागेची व्यवस्था होतपर्यंत अतिक्रमण हटाव कारवाई थांबणार
The गडविश्व
गडचिरोली : फुटपाथ धारकांना पर्यायी जागा आणि व्यवस्था केल्याशिवाय नगर परिषद अंतर्गत सुरु केलेली अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात येवू नये यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या आंदोलनाला आज मोठे यश मिळाले आहे. आज नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी आणि फुटपाथ धारकांचे प्रमुख नेतृत्व यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ३०० फुटपाथ धारकांना पर्यायी जागा, २८७ फुटपाथ धारकांचे हाॅकर झोनमध्ये सामावून घेणे, कारगिल चौकात बांधकाम केलेले ८१ गाळे फुटपाथ धारकांनाच देण्यासाठी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात यावा या मागण्या नगर परिषद प्रशासनाने मान्य केल्या.
फुटपाथ धारकांच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे, देवेंद्र चिमनकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मिलींद बांबोडे, प्रहारचे निखिल धार्मिक, वंचित आघाडीचे नेते बाळू टेंभुर्णे, फुटपाथ संघटनेचे नंदकिशोर भैसारे, नविनभाई गडकरी, सोमनानी यांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी विशाल वाघ यांचेशी फुटपाथ धारकांच्या मागण्यांसाठी वाटाघाटी करण्यात आल्या.
दरम्यान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी नगर परिषदेला अचानक भेट देऊन फुटपाथ धारकांना पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण हटाव कारवाई स्थगित करण्याची मागणी समर्थन देवून तोडगा काढण्यासाठी मुख्याधिकारी विशाल वाघ यांना सांगितले. त्यानंतर मुख्याधिकारी विशाल वाघ, आमदार धर्मरावबाबा आत्राम, शेकाप नेते भाई रामदास जराते आणि शिष्टमंडळाने शेकडो फुटपाथ धारकांसमोर येवून आजच्या चर्चेतून गडचिरोली शहरातील फुटपाथ धारकांना येत्या आठवडाभरात पर्यायी जागेची व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण हटाव कारवाई थांबविण्यात येत असल्याचे व बैठकीतील निर्णय कळविण्यात आले.
आजच्या चर्चेतून गडचिरोली शहरातील फुटपाथ धारकांच्या जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पहील्यांदाच मोठा प्रयत्न होत असल्याचे सांगून फुटपाथ धारकांनी समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here