– हत्येचे कारण गुलदस्त्यात, अनेक तर्क वितर्क
The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील लाहेरी टोला येथील युवकाची आदिवासी दिनी अज्ञातांनी गोळी झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. किशोर कुडयामी, (२३) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार, मृतक किशोर कुडयामी हा भर्तीपूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी गडचिरोली येथे गेला होता अशी माहिती आहे. दरम्यान काल ९ ऑगस्ट रोजी आदिवासी दिनी रात्रोच्या सुमारास किशोरच्या बहिणीला घराबाहेर कोणीतरी बंदूक पकडून असल्याचे दिसले व ही माहिती किशोरला सांगितली व किशोरला बाहेर जाऊ नको असे सुद्धा बजावले मात्र किशोर कोण आहे म्हणून टॉर्च पकडून बाहेर पाहवयास गेला असता अज्ञातांनी किशोरवर गोळी झाडली. यात किशोरचा मृत्यू झाला अशी माहिती आहे.
या हत्येमागे नक्षल्यांचा हात असल्याची शंका व्यक्त केल्या जात आहे परंतु हत्येमागील सत्यता पुढील तपासाअंतीच कळणार आहे. या घटनेने मात्र परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहे.