गडचिरोली जिल्ह्याला आजपासून दोन दिवस रेड अलर्ट

9601
File Photo

– हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा

The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : जिल्ह्यात काही दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
काल ७ ऑगस्ट पासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक मार्ग बंद झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा जिल्हयाशी संपर्क तुटलेला आहे. जिल्ह्याला आजपासून दोन दिवस रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला असून मुसळधार, विजांच्या कडकडाटेसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी उचित खबरदारी घेणे आवश्यक आहे.

पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने उचित सतर्कता बाळगणेसंदर्भात सावधानतेचा इशारा

आज ८ ऑगस्ट, २०२२ रोजी भारतीय हवामान विभागाने पुढील ४८ तासाकरीता गडचिरोली जिल्हयामध्ये पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे. तर १० ऑगस्ट, २०२२ करीता ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.७ ऑगस्ट, २०२२ पासुन वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये व गडचिरोली जिल्ह्यासह नजीकच्या जिल्हयामध्ये सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे गोसीखुर्द प्रकल्प, अप्पर वर्धा प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प, येलंमपल्ली प्रकल्प, पार्वती बॅरेज, सरस्वती बॅरेज व मेडीगड्डा बॅरेज यांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहीत करण्यात येत असुन अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. परिणामी जिल्हयात वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती या नद्यांकाठी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या हवामान विभागाने दिलेला पावसाचा रेड अलर्ट व ऑरेंज अलर्ट, तसेच वैनगंगा, वर्धा, प्राणहिता, इंद्रावती व गोदावरी नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता संबंधीत तहसिलदार यांनी संभाव्य पूरबाधीत भागात वेळोवेळी दवंडी द्यावी तसेच प्राप्त परिस्थितीचा विचार करुन विविध विभागांच्या समन्वयातून आवश्यकता पडल्यास तात्काळ सदर परिसरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची व्यवस्था करावी.
नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

जिल्हयात १ जून पासून आतापर्यंत ११३१.९ मीमी पावसाची नोंद

तालुका नुसार पावसाची नोंद मीमी मध्ये

गडचिरोली-१००.४, कुरखेडा-२०.३, आरमोरी-४२.७, चामोर्शी – ८६.८, सिरोंचा ३६.६, अहेरी ५१.४, एटापल्ली १११.१, धानोरा ६१.४, कोरची २५.३, देसाईगंज ४२.६, मुलचेरा १५६.४, भामरागड ५२.०

परिसरानुसार पावसाची नोंद मीमी मध्ये

मुलचेरा सर्वाधिक १५६.४, गडचिरोली १०९.४, येवली ९४.४, पिसेवडधा ७६.२, चामोर्शी ७०.०, कुनघाडा १०५.०, आष्टी ८२.०, असरअल्ली ६८.८, जारावंडी ११३.६, कसनसूर १०५.०, गट्टा १०७.४, चातगाव ७५.४, पेंढरी ७०.६

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here