गडचिरोली जिल्ह्याकरिता २०२१-२२ या वर्षाकरिता प्राप्त झालेला ४५४.२२ कोटी रुपयांचा निधी शंभर टक्के खर्च

362

– चालु वर्षासाठी जिल्हा नियोजनकरीता ५०८.१२ कोटी रुपयांची अर्थसंकल्पित तरतूद
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 अंतर्गत एकूण मंजुर नियतवय रु. 454.22 कोटी होता. सन 2021-22 मध्ये जिल्हयास 454.22 कोटी निधी प्राप्त झाला. त्यापैकी कार्यकारी यंत्रणांनी शंभर टक्के निधी खर्च केलेला आहे. तसेच यावर्षीसाठी राज्यस्तरावरुन सन 2022-23 साठी एकुण मंजूर नियतव्यय रु. 508.12 कोटी रु. पैकी सर्व निधीची अर्थसंकल्पित तरतूद केलेली आहे. पैकी 45.71 कोटी निधी प्राप्तही झालेला आहे. याबाबतची माहिती काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकित सादर करण्यात आली. जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी मागील वर्षाचा खर्चाचा आढावा घेणेत आला. सन 2021-22 मधील जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या कामांना मंजूरीही आज देण्यात आली. या बैठकीला आमदार व सन्मानिय सदस्य ऑनलाईन स्वरुपात उपस्थित होते.
बैठकीत जिल्हयातील विविध विकास कामांवरती आढावा घेण्यात आला. तसेच सदस्यांनी वेगेवगळया समस्यांही मांडल्या. यामध्ये नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलण्याच्या सूचनाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. जिल्हयातील वीज समस्येबाबत नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत चर्चा झाली. नक्षलग्रस्त दुर्गम भागात वीज भारनियमन होता कामा नये अशी मागणी सदस्यांनी केली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत संबंधीत मंत्री महोदय यांचे बरोबर बैठक घेवून अडचण सोडवू असे आश्वासन दिले.
कमलापूर हत्ती स्थलांतराबाबत विविध सदस्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी चर्चा केली व हत्तींना बाहेर हलविण्याबाबत मंजूरी देवू नये अशी मागणी केली. याबाबत वन विभाग व जिल्हाधिकारी यांनी एकत्रित बसून जिल्हयातील सर्वसामान्य लोक व लोकप्रतिनिधी यांच्या भावनांचा व जिल्हयातील पर्यटनाचा विचार करुन तसा अहवाल तयार करावा अशा सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. याबाबत आपण तातडीने मुख्यमंत्री महोदयांशी या मुद्दयावर बोलू असे सांगितले. जिल्हा नियोजन समितीचा ठराव मुख्यमंत्री यांचेपर्यंत देवू असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तीर्थस्थळे व पर्यटन स्थळांच्या क वर्ग यादीत सहा ठिकाणांचा समावेश

जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळांच्या क वर्ग यादीत वडसा आणि आरमोरी तालुक्यातील सहा ठिकाणांचा समावेश करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. यात शिव मंदिर देवस्थान जुनी आरतीतोंडी पळसगाव तालुका आरमोरी, शिव मंदिर देवस्थान डोंगरी आरमोरी, दुर्गा मंदिर देवस्थान राम सागर आरमोरी, दत्त मंदिर देवस्थान बोडधा तालुका वडसा, शिव मंदिर देवस्थान पोटगाव वडसा व शिव मंदिर देवस्थान डोंगरमेंढा तालुका वडसा यांचा समावेश आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीना यांनी सादरीकरण करून गतवर्षी झालेल्या खर्चाबाबत ची माहिती सादर केली समितीच्या बैठकीत प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके यांनी केले. जिल्हा नियोजन विभागाने सन 2021 -22 मध्ये सर्व कार्यकारी यंत्रणांना पालक मंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत निधी उपलब्ध करून खर्चाबाबत वेळोवेळी आढावाही घेतला यातूनच सर्व निधी वेळेत पूर्ण झाल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके यांनी सांगितले.

मान्सूनपूर्व बैठकीत पावसाने होणारे नुकसान व मनुष्यहानी टाळण्याच्या सूचना

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हास्तरीय मान्सून पूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी आपत्ती दरम्यान नुकासान टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गडचिरोली जिल्हयात दरवर्षी आपत्तीजनक परिस्थिती उद्भवभत असते. त्यासाठी सर्व यंत्रणांनी अलर्ट राहुन मनुष्यहानी व इतर शेतीविषयक नुकसान होणार नाही याबाबत नियोजन करावे अशा सूचना शिंदे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
राष्ट्रीय महामार्ग पावसाळयाआधी दुरुस्ती करणे, आपत्ती वेळी निवाऱ्याची ठिकाणे अंतिम करणे, अनुभवी स्थानिक अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेवून नियोजन करणे व संजय सरोवर तसेच गोसी खूर्द येथील अधिकाऱ्यांशी पावसाळयात सतत संपर्क ठेवणे अशा विविध सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकित दिल्या. बैठकीत जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी 5 बोटींची मागणी असल्याचे सांगितले यावेळी पालकमंत्री यांनी तातडीने सदर बोटी खरेदी करण्याचे निर्देश व मंजूरी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here